पानसरेंच्या प्रकृतीचा धोका टळला
By Admin | Updated: February 19, 2015 02:01 IST2015-02-19T02:01:50+5:302015-02-19T02:01:50+5:30
ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून बुधवारी ते शुद्धीवर आले. त्यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला आहे.

पानसरेंच्या प्रकृतीचा धोका टळला
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून बुधवारी ते शुद्धीवर आले. त्यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला आहे. त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांची प्रकृतीतही सुधारणा झाली असून पोलिसांनी सायंकाळी त्यांचा जबाबही घेतला. दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याने पानसरे कुटुंबीय तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील ताण कमालीचा हलका झाला.
पानसरे दाम्पत्यावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील शास्त्रीनगरातील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू असल्याने त्यांना बोलता येत नसले तरी त्यांनी सकाळी स्नुषा मेघा यांना खुणेनेच ‘आपण बरे’ असल्याचे सांगितले.
सायंकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले व डॉ. अजय केणी यांनी पानसरे यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यास ४८ तास उलटून गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीस असलेला धोका टळला आहे. ते शुद्धीवर आले आहेत. बोलण्यास प्रतिसाद देत आहेत. नाडीचे ठोके व रक्तदाब स्थिर आहेत. छाती, मान व घसा याठिकाणचा रक्तस्राव पूर्णत: आटोक्यात आला आहे. फुफ्ुफसाची सूज व शस्त्रक्रियेमुळे वेदना होतात. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात येईल. आता नळीद्वारे त्यांना पाणी दिले जात आहे. प्रकृतीतील सुधारणा होण्यास दहा-बारा दिवस लागू शकतात. त्यांच्या प्रकृतीकडे आमचे सातत्याने लक्ष आहे.
डॉ. केणी म्हणाले, ‘उमा पानसरे या पूर्ण शुद्धीत आहेत. त्यांच्या मेंदूला डाव्या बाजूला मार लागल्याने उजव्या मेंदूवर ताण आला आहे. त्यामुळे उजव्या बाजूचे हात-पाय जड झाले आहेत; परंतु हा ताण कमी होईल तसे त्यांच्या हालचाली वाढतील. दोघांनाही नळीद्वारे पाणी व पातळ द्रव पदार्थ दिले जात आहेत.
हल्ल्याला ‘टोल’ची किनार
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंवरील हल्ल्याचे साम्य पाहता, हे संकुचित मनोवृत्तीचे कृत्य आहे. हल्ल्यामागे नथुराम गोडसे प्रवृत्तीचा अथवा टोलबाबतचा संबंध आहे का, हे तपासावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी येथे केली.
मुंडे यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते म्हणाले, हल्ला होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांना धागेदोरे मिळालेले नाहीत. कोल्हापूर टोलमुक्त करण्यासाठी पानसरे यांनी सर्वांना एकत्रित घेऊन लढा दिला. त्यामुळे टोलचा संबंधही तपासावा. दाभोलकरांच्या हल्लेखोरांना पकडण्यात, शोधण्यात आमचे सरकार कमी पडले.
मानवी हक्क आयोगाने अहवाल मागविला
गोविंद पानसरेंवरील हल्ला ही ‘गंभीर घटना’ असल्याचे नमूद करून राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने त्याविषयी महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागविला आहे. आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार पानसरे यांच्यावरील हल्ल्याची स्वत:हून दखल घेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस काढली असून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन त्यांना सुरक्षित व मोकळेपणाने आपले काम करता येईल, असे वातावरण निर्माण करणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पानसरे हल्ल्याबाबत आठ शक्यतांची तपासणी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याबाबत आठ शक्यता पोलिसांना जाणवत असून त्या दृष्टीने तपास करण्याकरिता पोलिसांची २० पथके तयार केली आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. पानसरे यांच्यावर झाडलेल्या गोळ््यांवर क्रमांक असल्याने हे शस्त्र कुणाचे, कुठून आले हे शोधून काढणे व गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सोपे असल्याचे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ््या झाडल्यानंतर पंचनामा करण्यास विलंब झाला होता. शिवाय त्या हत्येत गावठी कट्टा वापरला होता. पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तात्काळ पंचनामा करून घेतला. घटनास्थळी मिळालेल्या गोळ््यांवर क्रमांक असल्याने हल्ल्याकरिता कुठले शस्त्र वापरले व त्याचा मूळ मालक कोण, ते हल्लेखोरांकडे कसे आले वगैरे बाबींचा तपास शक्य आहे.
पानसरे हे मॉर्निंग वॉक केल्यावर एका विशिष्ट ठिकाणी इडली खाण्याकरिता पत्नीसोबत थांबले. हल्लेखोरही तेथेच होते. त्यांनी पानसरे यांच्याकडेच त्यांच्या पत्त्याची विचारपूस केली. त्यानंतर गोळीबार केला, अशी माहिती शिंदे यांनी दिली. पानसरे यांच्यावरील हल्ला त्यांची विचारसरणी मान्य नसल्यामुळे झाला, त्यांच्या टोलविरोधी आंदोलनातून झाला की अन्य कुठल्या कारणावरून झाला याच्या आठ शक्यतांची पोलीस पडताळणी करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका : पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे़ दाभोलकर हत्येचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसारच सीबीआयला सोपवण्यात आला आहे़ आता पानसरेंवरील हल्ल्याचा तपासही सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़
हल्ल्यापूर्वी विचारले, ‘पानसरे तुम्हीच का..?’
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी दोघा हल्लेखोरांनी मोटारसायकलीवरून येऊन ‘पानसरे तुम्हीच का..?’ असे थेट पानसरे अण्णांनाच विचारले होते, अशी माहिती तपासात स्पष्ट होत आहे. हल्ला करणारे दोन्ही तरुण अंदाजे २५वर्षे वयाचे असून, त्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, असेही चौकशीत निष्पन्न होत आहे.
एसआयटी नेमा
पानसरेंवरील हल्ला विध्वंसक मार्गाने जाणाऱ्या धार्मिक संघटनांनी केला असून, त्याच्या तपासाकरिता विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
च्कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे़ सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे़ सोमवारी पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणे पानसरे यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती़
च्दाभोलकर यांची हत्या मॉर्निंग वॉक करतानाच सकाळच्या वेळेत झाली़ अशाच प्रकारे पानसरे यांच्यावर सकाळच्यावेळेतच हल्ला झाला़ हा हल्ला देखील सुनियोजितच होता़ दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत़ याचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसारच सीबीआयला सोपवण्यात आला आहे़ तेव्हा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपासदेखील सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे़