नकारात्मक विचारांमुळे हृदयविकाराचा धोका
By Admin | Updated: April 13, 2015 05:44 IST2015-04-13T05:44:17+5:302015-04-13T05:44:17+5:30
कामाचा ताण, कामाच्या वेळा पाळणे, दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करणे अशा कारणांमुळे अनेक तरुणांच्या मनावर ताण असतो. या ताणाचे रूपांतर अनेकदा

नकारात्मक विचारांमुळे हृदयविकाराचा धोका
मुंबई : कामाचा ताण, कामाच्या वेळा पाळणे, दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करणे अशा कारणांमुळे अनेक तरुणांच्या मनावर ताण असतो. या ताणाचे रूपांतर अनेकदा नकारात्मक विचारात होत असते. पण हे नकारात्मक विचार आणि ताण सातत्याने राहिल्यास त्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवत असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे.
हिंदुजा रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी. के. पोंडे यांनी यासंदर्भातील एक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, मुंबईतील एक ३८वर्षीय व्यक्ती श्वसनाचा त्रास होत असल्याने माझ्याकडे आली. या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला होता. त्याचा ईसीजी काढल्यानंतर हृदयाच्या दोन प्रमुख धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्याच्यावर तत्काळ अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही व्यक्ती व्यसनी नव्हती. पण, त्याला कामानिमित्त अनेकदा बाहेरगावी जावे लागायचे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याची विचारसरणी नकारात्मक झाली होती.
सततच्या ताणामुळे अनेक जणांना हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यामुळे हृदयातील धमन्यांमध्ये रक्त साखळले जाऊन ब्लॉकेज तयार होतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे डॉ. पोंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)