उगवत्या खेळाडूचा डेंग्यूने घेतला बळी

By Admin | Updated: August 1, 2014 11:28 IST2014-07-31T21:53:07+5:302014-08-01T11:28:03+5:30

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विशेष ठसा उमटवण्याची धमक असणारी अॅथलेटिक्स खेळातील प्रतिभावान खेळाडू अश्विनी बोलकरच्या रूपाने एक प्रतिभावान खेळाडू औरंगाबादने बुधवारी रात्री ११ वाजता गमावला.

The rising player took the dengue | उगवत्या खेळाडूचा डेंग्यूने घेतला बळी

उगवत्या खेळाडूचा डेंग्यूने घेतला बळी

आंतरविद्यापीठीय खेळाडू अश्विनी बोलकरचे दुर्दैवी निधन
औरंगाबाद : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विशेष ठसा उमटवण्याची धमक असणारी अॅथलेटिक्स खेळातील प्रतिभावान खेळाडू अश्विनी बोलकरच्या रूपाने एक प्रतिभावान खेळाडू औरंगाबादने बुधवारी रात्री ११ वाजता गमावला. या उगवत्या खेळाडूचे डेंग्यूच्या आजारामुळे दुर्दैवी निधन झाले.
विवेकानंद महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसर्‍या वर्षात शिकत असणार्‍या अश्विनी बोलकर हिच्यावर आज सकाळी ११ वाजता एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
१५ जुलै रोजी १९ वर्षे पूर्ण झालेल्या अश्विनीत जिद्द, मेहनत आणि साहस या गुणांचा मिलाफ होता. अॅथलेटिक्स आणि जम्परोपमध्ये स्थानिक असो की राज्यस्तरीय स्पर्धा, तिने तब्बल ४0 पदकांची लयलूट केली होती आणि जवळपास २00 प्रमाणपत्रे तिला खेळातील कौशल्यामुळे मिळाली होती.
अश्विनीला बालपणापासूनच खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे बळीराम पाटील प्रशालेत असताना ती प्रारंभापासूनच खो-खो, लंगडी अशा स्पर्धांत उत्साहाने सहभागी व्हायची आणि नंतर ती अॅथलेटिक्स खेळाकडे वळली. बळीराम पाटील प्रशालेत तर तिला भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषाचीच पदवी दिली होती. शाळेत असताना ती प्रथम ३ कि. मी. धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायची आणि त्यानंतर तिचा प्रगतीचा ग्राफ कायम उंचावतच राहिला. विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तर ती मराठवाड्यातील २00 मीटर धावण्यात नेहमीच नंबर वन असायची. मोठमोठ्या खेळाडूला लाजवेल असे जबरदस्त रनिंग टेक्निक असणार्‍या अश्विनीने २0१३ मध्ये बंगलोर येथे कल्याणी ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारण्याची किमया साधली होती. अशी कामगिरी करणारी अश्विनी ही मराठवाड्यातील एकमेव खेळाडू. त्याचप्रमाणे तीन वेळेस तिने आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता.
२00८ ते २0१४ या कालावधीत तिने अहमदनगर, पुणे, जळगाव, सोलापूर, अंधेरी, परभणी, नाशिक आदी ठिकाणी अॅथलेटिक्स आणि जम्परोप स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. अॅथलेटिक्समधील १00 आणि २00 मीटर धावण्यात तिचे विशेष कौशल्य होते.

Web Title: The rising player took the dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.