पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा
By Admin | Updated: December 25, 2014 02:03 IST2014-12-25T02:03:29+5:302014-12-25T02:03:29+5:30
कोरेगाव पार्कमधील एका सराफी दुकानावर चौघांनी सशस्त्र दरोडा टाकत तब्बल एक कोटी ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा
पुणे : कोरेगाव पार्कमधील एका सराफी दुकानावर चौघांनी सशस्त्र दरोडा टाकत तब्बल एक कोटी ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सोने आणि हिऱ्यांचे दागिने लंपास केले. पोलिसांना चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यांनी वापरलेली मोटारही जहांगीर रुग्णालयाजवळ सापडली आहे.
कोरेगाव पार्कमध्ये पीएमजी जेम्स अॅन्ड ज्वेलर्सचे दुकान आहे. येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास एक पुरुष आणि एक महिला पतीपत्नी असल्याच्या बहाण्याने आले. पाच लाखांपर्यंतचे हिऱ्याचे दागिने दाखवण्यास सांगून त्यांनी पाच-सहा दागिने पाहिले. साधारणपणे पंधरा मिनिटांनी आणखी दोन तरुण आले. त्यांनीही काही दागिने दाखवायला सांगितले. दागिने पाहणे सुरू असतानाच त्यापैकी तिघांनी पिस्तुल दुकानातील कर्मचाऱ्यांवर ती रोखून ‘दागिने आणि पैसे काढून द्यायला’ सांगितले. यातील एकाने काऊंटरची काच फोडली आणि दागिने उचलून हे सर्व मोटारीत बसून पसार झाले.