दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी रिंगणनाट्य!
By Admin | Updated: February 3, 2015 01:32 IST2015-02-03T01:32:45+5:302015-02-03T01:32:45+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला १८ महिने पूर्ण होत आहेत.
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी रिंगणनाट्य!
उस्मानाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला १८ महिने पूर्ण होत आहेत. तपासात अद्याप प्रगती झालेली नसल्याने १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे ‘सॉक्रिटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
पाटील म्हणाले, की दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत, याकरिता केंद्र शासनाकडे यापूर्वीही दाद मागितली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात जातपंचायतविरोधी कायदा व्हावा आणि जातपंचायतीच्या मनमानीला चाप लागावा, यासाठी लढा अधिक तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जातपंचायतीमुळे पीडित झालेल्या १०० गुन्ह्यांची नोंद राज्यभरात असून, एकट्या रायगड जिल्ह्यात ही संख्या ४२च्या घरात आहे. प्रशासन केवळ सामाजिक शांतता निर्माण करण्यावर समाधान मानत आहे. याच अनुषंगाने ८ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरोधात पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जादूटोणाविरोधी कायद्यान्वये राज्यात आतापर्यंत सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत. हा कायदा प्रभावीपणे अमलात येत आहे, मात्र अद्याप त्याची नियमावली तयार नाही. दक्षता अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची व अधिकाराची त्यात स्पष्टता नाही़ ती नियमावली लवकरच पूर्णत्वास यावी, यासाठी अंनिस सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय परिषद घेणार
येत्या २० आॅगस्टला डॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होतील. अंनिसचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या अनुषंगाने आॅगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.