‘टीडीआर’साठी रिंगरोडचा घाट

By Admin | Updated: July 11, 2017 00:25 IST2017-07-11T00:25:19+5:302017-07-11T00:25:19+5:30

रिंगरोडचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याने त्याविरोधात काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी परिसरातील नागरिक एकवटले आहेत

Ring road ferries for 'TDR' | ‘टीडीआर’साठी रिंगरोडचा घाट

‘टीडीआर’साठी रिंगरोडचा घाट

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील कालबाह्य रिंगरोडचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याने त्याविरोधात काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी परिसरातील नागरिक एकवटले आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप व भारिप बहुजन महासंघाने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
चिंचवड परिसरात प्रशस्त रस्ते आहेत. त्यामुळे लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून नवे रस्ते करण्याची गरज नाही. रिंगरोडच्या परिसरात नेत्यांनी जमिनी खरेदी केल्या आल्या आहेत़ त्यातून टीडीआर मिळविण्याचा डाव आहे, त्यासाठी रिंगरोडचा घाट आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. आमच्याशिवाय प्रश्न सुटत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, आम्ही जनतेबरोबर आहोत, अशी भूमिका भाजपा गटनेते एकनाथ पवार यांनी घेतली आहे.
प्राधिकरणातील रिंगरोडवरून राजकीय पक्षांत जुंपली आहे. नागरिकांचे आदोलन तीव्र झाल्याने त्यास पाठिंबा देण्यासाठी भाजपा वगळता सर्वच पक्ष उतरले आहेत. यासंदर्भातील पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, शेकापचे शहराध्यक्ष हरिष मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, संघटक विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील एकाही बांधकामांची वीट हलू देणार नाही, पूर्ण शास्ती कर माफ करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. अनधिकृत बांधकामे, प्राधिकरणातील घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. आता या प्रश्नांचा विसर त्यांना पडला आहे. रिंगरोड बाधित स्वयंस्फूर्तीने स्वत:चे हक्काचे घर वाचविण्यास रस्त्यावर उतरले आहेत. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भाजपाला विरोधकांवर आरोप करण्यासाठी मुद्दा सापडला नाही. तर या आंदोलनामागे विरोधकच आहेत, असे भाजपाने आळविला राग चुकीचा आहे.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस
विरोधात असताना भाजपाचे अनेक नेते आमच्याबरोबरच आंदोलन करत होते. परंतु, सत्ता येताच श्रेयवादाचे गलिच्छ राजकारण करत आहेत. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून रिंगरोड बाधितांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. - मारुती भापकर
शहरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. कायदे जनहितासाठी आहेत. रिंगरोड रद्द करता येऊ शकतो किंवा स्थलांतरित होऊही शकतो. रिंगरोडवर उद्यान केले जात आहे. संघर्ष समितीच्या लोकांना रिंगरोड होणारच, असे सत्ताधारी सांगतात. ही बाब चुकीची आहे. सत्ताधाऱ्यांकडून रिंगरोडचा अट्टाहास धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे. - राहुल कलाटे, शहराध्यक्ष, शिवसेना

Web Title: Ring road ferries for 'TDR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.