पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची मुभा
By Admin | Updated: October 11, 2014 06:00 IST2014-10-11T06:00:19+5:302014-10-11T06:00:19+5:30
न्या़ कदम यांनी मतदान करण्यास जाण्यासाठी परवानगी दिली़ त्यांना १५ आॅक्टोबर रोजी पोलीस बंदोबस्तात सकाळी सात वाजता घेऊन जावे व सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा कारागृहात आणण्याचे आदेशही दिले़

पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची मुभा
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणात सध्या धुळे जिल्हा कारागृहात असणारे आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह पाच जणांना पोलीस बंदोबस्तात जळगाव येथे मतदान करण्यासाठी जाण्यास परवानगी न्यायालयाने दिली आहे़ या पाचही जणांनी न्यायालयाकडे अर्ज केले होते़
विशेष न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ कदम यांच्यापुढे या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली़ जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आमदार सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी व राजा मयुर यांनी विधानसभा निवडणुकीत जळगाव येथे मतदान करण्यास जाण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केले होते़ त्यावर आज कामकाज झाले़ न्या़ कदम यांनी मतदान करण्यास जाण्यासाठी परवानगी दिली़ त्यांना १५ आॅक्टोबर रोजी पोलीस बंदोबस्तात सकाळी सात वाजता घेऊन जावे व सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा कारागृहात आणण्याचे आदेशही दिले़ सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड़ शामकांत पाटील यांनी कामकाज पाहिले़
पत्रकारांशी संवाद; युक्तिवाद
जळगाव येथे कोणती कामे केली, काय विकास केला़, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविता यावी यासाठी पत्रकारांना निवेदन देता यावे किंवा त्यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी त्यांना कारागृहात येण्यास परवानगी मिळावी, असे अर्जही सुरेशदादा जैन व गुलाबराव देवकर यांनी न्यायालयाला दिले होते़ त्यावर शुक्रवारी युक्तिवाद झाला़
दरम्यान, प्रदीप रायसोनी यांच्या जामीन अर्जावर २७ आॅक्टोबर रोजी कामकाज होणार आहे. (प्रतिनिधी)