जीवनदायीच्या रकमेसाठी शस्त्रक्रियेत ‘हेराफेरी’!
By Admin | Updated: July 1, 2014 02:23 IST2014-07-01T01:46:45+5:302014-07-01T02:23:21+5:30
अकोला येथील सिटी हॉस्पिटलमधील प्रकार; जीवनदायी योजनेतून रक्कम लाटण्यासाठी जीवघेणी शस्त्रक्रिया

जीवनदायीच्या रकमेसाठी शस्त्रक्रियेत ‘हेराफेरी’!
सचिन राऊत / अकोला
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी ५२ वर्षीय इसमावर पाठीच्या मणक्यांची जीवघेणी शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताच या इसमाच्या पाठीत टाकण्यात आलेले स्क्रू काही वेळातच काढल्याने या शस्त्रक्रियेत मोठी हेराफेरी झाल्याचे वास्तव काही डॉक्टरांकडून माहिती घेतल्यानंतर उजेडात आले आहे.
गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ यांना पाठीचा त्रास असल्याने १४ मे रोजी रामदास पेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी उपचार करून दुसर्याच दिवशी १५ मे रोजी पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आल्याचे डॉ. गडपाल व डॉ. महाशब्दे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले व तसे एक्स-रेमध्येसुद्धा दाखवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी वाघ यांना पाठीचा त्रास वाढल्याने उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात आणले. यावेळी डॉ. महाशब्दे यांनी तपासणी केली; मात्र पुढील उपचारासाठी डॉ. गडपाल यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. वाघ यांना तातडीने डॉ. गडपाल यांच्याकडे नेण्यात आले. नेमके याचवेळी ते बाहेरगावी असल्याने रुग्णास अन्य एका डॉक्टरांकडे उपचारार्थ दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरने पुन्हा एमआरआय व एक्स-रे काढले असता त्यांच्या पाठीत स्क्रू नसल्याचे आढळल्याने त्यांनी उपचार करण्याचे टाळले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना आधीच्या शस्त्रक्रियेमध्ये हेराफेरी झाल्याची शंका आली. २३ जून रोजी वाघ यांना पुन्हा डॉ. गडपाल यांच्याकडे नेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरचे स्क्रू शस्त्रक्रिया केल्यानंतर लगेच काढल्याचे सांगितले. वाघ यांचा त्रास कमी न होता वाढतच असल्याने डॉ. गडपाल यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून २५ जून रोजी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगून ३0 हजार रुपये जमा करण्याचे सांगितले; मात्र वाघ यांच्या नातेवाइकांनी रक्कम जमा न करता रुग्णालयातून सुटी घेतली. त्यानंतर त्यांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.