दंगल, बॉम्बस्फोटग्रस्तांच्या मदतीत भरघोस वाढ
By Admin | Updated: October 15, 2015 02:54 IST2015-10-15T02:54:43+5:302015-10-15T02:54:43+5:30
दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी कारवाया आदी मानविनर्मित आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

दंगल, बॉम्बस्फोटग्रस्तांच्या मदतीत भरघोस वाढ
मुंबई : दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट व नक्षलवादी कारवाया आदी मानविनर्मित आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयात शासकीय मदतीसाठी प्रथमच नक्षलवादी कारवायांमधील आपद्ग्रस्त पात्र ठरविण्यात आले आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दंगल आणि दहशतवाद या मानविनर्मित आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मालमत्तेच्या नुकसानीपोटी सानुग्रह अनुदान
व आर्थिक मदत देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले.
तसेच सध्या देण्यात येणाऱ्या
मदतीचे दर १० वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आलेले असल्यामुळे यात सुधारणा करण्यात आली. मालमत्तेच्या नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्तीसाठी असणाऱ्या निकषांचा या निर्णयासाठी अवलंब करण्यात येणार आहे. ही मदत मिळण्यास उत्पन्नाची कोणतही मर्यादा नसून संबंधितांना तीन वर्षांच्या आत त्यासाठी दावा करावा लागणार आहे. मात्र मदत मिळविण्यास बाधित व्यक्तीचा घटनेत गुन्हेगार म्हणून सहभाग नसणे आवश्यक आहे. तसेच मदत देण्यापूर्वी संबंधित विभागाकडून त्याबाबत अभिप्रायही घेण्यात येईल. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली असल्यास ही मदत देण्यात येणार नाही. मदतीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असेल.