रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लांबणीवरच
By Admin | Updated: June 27, 2015 02:36 IST2015-06-27T02:36:20+5:302015-06-27T02:36:20+5:30
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला हायकोर्टाकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही भाडेवाढ करण्यासाठी ४५ दिवसांत मीटरचे रिकॅलिब्रेशन करावे लागणार आहे

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लांबणीवरच
मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला हायकोर्टाकडून नुकताच हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही भाडेवाढ करण्यासाठी ४५ दिवसांत मीटरचे रिकॅलिब्रेशन करावे लागणार आहे. मात्र हे रिकॅलिब्रेशन करण्यास थोडा आणखी कालावधी लागणार आहे. त्यासाठी मीटरच्या सॉफ्टवेअरमधील बदलाला किमान सात दिवस लागणार असल्याचे वैधमापन शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ ही लांबणीवरच पडणार आहे.
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात एमएमआरटीएकडून (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) प्रत्येकी एक रुपया वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयावरून २२ रुपये होणार आहे. या भाडेवाढीला २४ जून रोजी मुंबई हायकोर्टानेही हिरवा कंदील दाखवला. मात्र मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये बदल) केल्याशिवाय चालक ही भाडेवाढ लागू करू शकत नाहीत. रिकॅलिब्रेशन करण्यासाठी किमान ४५ दिवसांची मुदत आरटीओकडून देण्यात आली आहे.
याबाबत वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी सांगितले की, मीटरमधील सॉफ्टवेअर बदलण्यासाठी किमान सात दिवस लागणार आहेत. हा बदल केल्यानंतरच मीटर रिकॅलिब्रेशनचे काम सुरू होईल. सध्या वैधमापन शास्त्र विभागाला नवीन भाड्याचे दरपत्रकच मिळाले आहे. त्यानुसार या विभागाकडून उत्पादकांना माहिती दिली जाईल आणि मगच सॉफ्टवेअरमध्ये बदल केला जाईल.