रिक्षाचालकांचे सोमवारी धरणे
By Admin | Updated: May 21, 2016 03:54 IST2016-05-21T03:54:43+5:302016-05-21T03:54:43+5:30
रेल्वे स्थानक परिसराचे असताना अन्य वाहनांच्या अवैधपणे होणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा युनियन सोमवार, २३ मे रोजी धरणे धरणार आहे.

रिक्षाचालकांचे सोमवारी धरणे
कल्याण : उदंड जाहले रिक्षा स्टॅण्ड, असे काहीसे चित्र डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसराचे असताना अन्य वाहनांच्या अवैधपणे होणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी लालबावटा रिक्षा युनियन सोमवार, २३ मे रोजी धरणे धरणार आहे. पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात हे आंदोलन होणार आहे.
रामनगर रिक्षा स्टॅण्ड, केळकर क्रॉस रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी सर्कल, मानपाडा रोड, चार रस्ता, नामदेव पथ क्रॉस रस्ता, शिवमंदिर चौक, एस.के. पाटील शाळा चौक, महात्मा फुले चौक, विष्णूनगर टपाल कार्यालयाचा चौक, दीनदयाळ चौक, स्टार कॉलनी, साईबाबा मंदिर चौक, मानपाडा पेट्रोलपंप चौक या ठिकाणी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. पाटकर रोड, नेहरू रोड, चिमणी गल्ली, केळकर रोड, सुभाष रोड या अधिकृत रिक्षा स्थानकांत बेकायदा पार्क होणाऱ्या अन्य वाहनांवर कारवाई करा आणि अधिकृत रिक्षा स्टॅण्ड पार्किंगमुक्त करा. डोंबिवली पूर्वेकडील पूर्व-पश्चिम स्थानकांलगतच्या परिसरात ‘परतीचे प्रवासी येथे उतरावेत’असे फलक लावावे.
मानपाडा रोडने रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रिक्षांना इंदिरा गांधी सर्कलमार्गे कॅनरा बँकेसमोर परतीचे प्रवासी सोडण्यास मंजुरी द्यावी, कालबाह्य रिक्षा बंद कराव्यात, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या समितीने सर्वेक्षण केल्यानुसार मीटर आणि शेअर पद्धतीने चालवणाऱ्या अधिकृत रिक्षा स्थानकाचे फलक लावावेत तसेच शेअरचे दरपत्रक लावावे, कल्याण आरटीओ कार्यालयात दलालांमार्फत खुलेआम सुरू असलेली रिक्षाचालकांची लूट बंद करा, अशा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
वाहतूक शाखेच्या आणि आरटीओच्या भ्रष्ट व कर्तव्यशून्य कार्यपद्धतीविरोधात हे आंदोलन असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)