रिक्षाचालकाची मुजोरी बेतली रुग्णाच्या जीवावर

By Admin | Updated: December 22, 2014 13:00 IST2014-12-22T08:56:41+5:302014-12-22T13:00:09+5:30

सदर बझार येथे हृदयविकाराच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिल्याप्रकरणी संतप्त जमावाने रिक्षासह स्टॉपच्या फलकाची तोडफोड केली.

Rickshaw driver's molestation | रिक्षाचालकाची मुजोरी बेतली रुग्णाच्या जीवावर

रिक्षाचालकाची मुजोरी बेतली रुग्णाच्या जीवावर

 कोल्हापूर : सदर बझार येथे हृदयविकाराच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिल्याप्रकरणी संतप्त जमावाने रिक्षासह स्टॉपच्या फलकाची तोडफोड केली. वेळेत उपचारासाठी दाखल न केल्याने तरुणाचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल मनोहर कोळी (वय ३५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. 
याबाबत पोलिसांनी सांगितले, सदर बझार येथे राहणारा अनिल कोळी हा तरुण हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक बेशुद्ध पडला. अन्य नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रिक्षा स्टॉपवर उचलून आणले. त्यांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालकांना विनंती केली असता ते रिक्षा सुरू करून तिथून पळून गेले. 
दरम्यान, कोळी याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बराच वेळ निघून गेल्याने रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी रिक्षा स्टॉपवर येऊन एका थांबलेल्या रिक्षासह फलकाची तोडफोड करीत गोंधळ घातला. या घटनेची माहिती समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत करीत घरी पाठविले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी) 

Web Title: Rickshaw driver's molestation