मुंबईत ३१ आॅगस्टला रिक्षा चालकांचा संप

By Admin | Updated: August 5, 2016 18:40 IST2016-08-05T18:40:31+5:302016-08-05T18:40:31+5:30

मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व ऊबेर यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे.

Rickshaw drivers contact in Mumbai on 31st August | मुंबईत ३१ आॅगस्टला रिक्षा चालकांचा संप

मुंबईत ३१ आॅगस्टला रिक्षा चालकांचा संप

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व ऊबेर यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

राव म्हणाले की, अवैध वाहतुकीचे पुरावे देत युनियनने १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे दिले होते. मात्र त्यानंतरही शासनाने युनियनची एकही मागणी पूर्ण केलेली नाही. शिवाय मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीसुद्धा झालेली नाही. उपनगरांत टाटा सुमो, तवेरा, इंडिका आणि खाजगी बसेससारख्या वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यांमुळे प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने उपनगरांत अवैध वाहतूक फोफावली आहे. याशिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरांत हजारो रिक्षा चालक विनाबॅज रिक्षा चालवत आहेत.

ज्या चालकांनी तीन वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालवण्याचा परवाना धारण केला आहे, त्यांना विनाविलंब बॅज देण्यात यावा. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालकांना सन्मानाने धंदा करता येईल, असेही
त्यांनी सांगितले.
ओला, उबेर सारख्या अ‍ॅग्रीग्रेटर्ससाठी कायदे व नियम तयार करण्यात राज्य सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे. राव म्हणाले की, १७ जून, २०१५ रोजी युनियनने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने प्रारुप नियम (ड्राफ्ट रूल्स) तयार करत, त्यांवर ३१ आॅक्टोबर २०१५ पूर्वी हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र या गोष्टीला १० महिने उलटल्यानंतरही
अग्रीग्रेटर्ससाठी कोणतेही नियम अथवा कायदा लागू करण्यात आलेले नाहीत.

एकीकडे रिक्षा चालकांवर कारवाई करायची, तरी दुसरीकडे कोणत्याही नियमाशिवाय रस्त्यावर वावरणाऱ्या अ‍ॅग्रीग्रेटर्सला अभय द्यायचे, हा शासनाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राव यांनी केला आहे.

८ आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहिम!
मुंबई पश्चिम आणि पूर्व उपनगरांत ८ आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहिम घेण्याची घोषणा युनियनने केली आहे. हजारो रिक्षा चालकांच्या स्वाक्षऱ्या ३१ आॅगस्टपर्यंत जमा केल्या जातील. त्यानंतर ३१ आॅगस्टला धंदा बंद ठेवून हजारो रिक्षा चालक आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील. यावेळी हजारो स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री
यांना सादर केले जाईल.


रिक्षा चालक-मालकांच्या प्रमुख मागण्या -
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर निर्बंध आणावेत.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आॅटोरिक्षाचा परवाना असलेल्या चालकांना बॅज देण्यात यावे.
ओला, उबेर यांसारख्या अग्रीग्रेटर्सवर तत्काळ बंदी घालावी.
आॅटोरिक्षा चालक व मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी.
मुंबईच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी आॅटोरिक्षाचे नवीन एक लाख परवान्यांचे वितरण करावे.

Web Title: Rickshaw drivers contact in Mumbai on 31st August