रिक्षातून दहा राज्यांमध्ये भ्रमंती

By Admin | Updated: February 1, 2015 02:03 IST2015-02-01T02:03:43+5:302015-02-01T02:03:43+5:30

लांबचा प्रवास म्हटला की रेल्वे किंवा विमानालाच पसंती दिली जाते. काही जण खासगी वाहन किंवा बसने प्रवास करतात.

Rickshaw delivers ten states | रिक्षातून दहा राज्यांमध्ये भ्रमंती

रिक्षातून दहा राज्यांमध्ये भ्रमंती

विशाल गांगुर्डे
ल्ल पिंपळनेर (जि.धुळे) :
लांबचा प्रवास म्हटला की रेल्वे किंवा विमानालाच पसंती दिली जाते. काही जण खासगी वाहन किंवा बसने प्रवास करतात. परंतु हजारो किलोमीटरचा प्रवास आणि तोसुद्धा कुटुंबासह रिक्षाने करणारी व्यक्ती निराळीच म्हटली पाहिजे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या नवंद्रराम उत्तमचंद पलाणी यांनी हे आगळेवगळे धाडस करून दाखवले. त्यांच्या भ्रमंतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पलाणी यांनी कुटुंबासह ५० दिवसांत १० राज्यात फिरून तब्बल ८,५०० किलोमीटरचा प्रवास रिक्षाने केला आहे. सटाण्यात यशवंत महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी भ्रमंतीला सुरुवात केली. त्यानंतर धुळे, मध्य प्रदेशातील बिजासनी देवी, इंदूर, उज्जैन, सिहौर, भोपाळ, सागर, छत्तरपूर, सतना, अलाहाबाद, वाराणसी, अयोध्या, लखनऊ, हरिद्वार, अंबाला, लुधियाना, अमृतसर, वाघा येथील भारत-पाक सीमा, जम्मू, कटरा, वैष्णोदेवी, दिल्ली, वृंदावन, मथुरा, आग्रा, जयपूर, अजमेर, पुष्कर, उदयपूर, हल्दीघाटी, अंबाजी, अहमदाबाद, बडोदा, सूरत, वार्सा आणि परत पिंपळनेर असा त्यांनी अविश्वसनीय प्रवास केला. प्रवासात त्यांनी हॉटेलात न थांबता कुठे नातेवाइकांकडे, धर्मशाळा, टोलनाका, गुरुद्वारा आणि पेट्रोल पंपांच्या ठिकाणी मुक्काम केला.

च्रिक्षाने पाच जणांचा प्रवास. त्यात नवंद्रराम हे एकटेच पुरुष इतर चार प्रवासी त्यांच्याच कुटुंबातील महिला होत्या. रिक्षा असल्याने त्यांना कुठे टोलसुद्धा द्यावा लागला नाही. अंथरुण, पांघरुण व स्वयंपाकाचे साहित्यही त्यांनी सोबतच घेतलेले होते. त्यामुळे त्यांचा प्रवास अवघ्या १८ हजार रुपयांत झाला.

नवंद्रराम यांनी चौसष्टाव्या वयातही स्वत: रिक्षा चालवत भ्रमंती पूर्ण केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या ८५ वर्षांच्या वयोवृद्ध आई रुकी आणि अवघ्या चार वर्षांची नात गायत्रीसुद्धा त्यांच्यासोबत प्रवासात होती.

६४व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स
देशभ्रमंतीसाठी नवंद्रराम यांनी ६४व्या वर्षी ड्रायव्हिंग ‘लायसन्स’ घेतले. देशप्रवासाचा मानस त्यांनी सांगितल्यावर अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले होते.

व्यवसायाचे पाश तोडून प्रवास
नवंद्रराम यांचा कॅरिबॅगचा व्यवसाय. व्यवसायामुळे त्यांचे कधीच फिरणे झाले नाही. त्यामुळे त्यांनी वयोवृद्ध आई व कुटुंबीयांना वैष्णोदेवीसह तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी हे धाडस केले.

Web Title: Rickshaw delivers ten states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.