क्रांती मूक मोर्चाचा ‘चित्र आक्रोश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 05:48 IST2016-11-03T05:48:47+5:302016-11-03T05:48:47+5:30
आरक्षणाअभावी तळागाळातील मराठा समाजाची झालेली वाताहत समाजासमोर मांडण्यासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत आहेत.

क्रांती मूक मोर्चाचा ‘चित्र आक्रोश’
चेतन ननावरे,
मुंबई- आरक्षणाअभावी तळागाळातील मराठा समाजाची झालेली वाताहत समाजासमोर मांडण्यासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत आहेत. मात्र, केवळ मोर्चा या माध्यमापुरते मर्यादित न राहता, चित्रांच्या माध्यमातून समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे आवाहन मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबई संयोजक समितीने केले आहे. त्यासाठी मराठा बांधवांना चित्र पाठवण्याचे आवाहन समितीने केले आहे.
संयोजक समितीने दिलेल्या माहितीनुसार, ‘चित्र आक्रोश’ असे प्रदर्शनाचे नाव असेल. या प्रदर्शनासाठी मराठा समाजाने, त्यांच्यावरील अन्याय चित्रांच्या माध्यमातून मांडायचा आहे. त्यात आरक्षणाअभावी शिक्षणात नुकसान झालेले विद्यार्थी, सरकारी नोकऱ्या न मिळाल्याने हताश झालेला युवा वर्ग, बढतीला मुकलेले कर्मचारी, आत्महत्या करत असलेले शेतकरी, अॅट्रॉसिटीच्या चुकीच्या वापरामुळे ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशी मराठा कुटुंबे आणि अत्याचारग्रस्त महिलावर्ग यांच्याबद्दलच्या भावना व उद्रेक चित्राद्वारे मांडण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ‘चित्र आक्रोश’साठी चित्र पाठवायची आहेत, त्यांनी केवळ ड्रॉइंग पेपरवर चित्र काढायची आहेत. १० नोव्हेंबर २०१६ पर्यंत चित्र पाठवण्याची मुदत आहे. त्यानंतर, राज्यभरातून येणाऱ्या निवडक चित्रांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे समितीने स्पष्ट केले, पण हे प्रदर्शन कधी आणि कुठे भरवण्यात येईल, याबाबत विचार सुरू असल्याचे समितीने स्पष्ट केले.
>...येथे पाठवा चित्र
ज्या मराठा बांधवांना आक्रोश चित्र पाठवायचे आहे, त्यांनी सावंतवाडी संस्थान मराठा समाज, तिसरा मजला, स्टार मॉल, एन.सी. केळकर मार्ग, शिवाजी मंदिर शेजारी, दादर (पश्चिम), मुंबई : ४०००२८ या पत्त्यावर चित्र पाठवण्याचे आवाहन संयोजक समितीने केले आहे.
आज वडाळ्यात नियोजन बैठक
मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे मुंबईमध्ये रविवारी निघणाऱ्या बाइक रॅलीची नियोजन बैठक गुरुवारी, ३ नोव्हेंबर रोजी वडाळ्यामध्ये होणार आहे.
वडाळ्यातील शक्तिनगरनजीक असलेल्या नायगांव एक्स मार्गावरील भारतीय क्रीडा मंदिरात सायंकाळी ६ वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीत सर्व तालुका प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक समितीने केले आहे.