‘सृष्टी गृहनिर्माणबाबत पुन्हा चौकशी’
By Admin | Updated: August 3, 2016 05:40 IST2016-08-03T05:40:47+5:302016-08-03T05:40:47+5:30
सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाहन पार्किंगवरून झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येईल

‘सृष्टी गृहनिर्माणबाबत पुन्हा चौकशी’
मुंबई : ठाण्यातील कोलबाड येथील सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाहन पार्किंगवरून झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. यासंदर्भातला प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अमित साटम, संजय केळकर यांनी उपस्थित केला होता.
या प्रकरणी पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत का, हेही तपासून पाहिले जाईल. चुकीचे गुन्हे दाखल झाले असतील, तर ते मागे घेण्यात येतील, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
बनावट कागदपत्रेप्रकरणी विशेष पथकाकडून चौकशी - मुख्यमंत्री
नवी मुंबईत सिडकोच्या मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून इमारती उभारल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी सिडकोच्या विशेष पथकामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. आमदार संजय सावकारे आणि आमदार योगेश सागर यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. नवी मुंबईतील कौपरखैरणे नोडमध्ये सेक्टर ९९ अस्तित्वात नाही. तथापि, कोपरखैरणे येथील सेक्टर ११ आणि ऐरोली सेक्टर ९ई येथील भूखंडाच्या वाटपाबाबत महामंडळाचे बनावट दस्तावेज तसेच त्रिपक्षीय करारनाम्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. सदर कागदपत्रांद्वारे नवी मुंबई महापालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्व संबंधितांविरुद्ध नवी मुंबईच्या सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तसेच याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश २६ जुलै रोजी
सिडको महामंडळाला देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
>एसआरए प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक - रवींद्र वायकर
एसआरए प्रकल्पाच्या विकासकाने सभासदांची फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत. याबाबत एसआरएचे संबंधित अधिकारी, विकासक यांच्यासमवेत आपण लवकरच बैठक घेऊ, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
अंधेरी येथील अमन, आकाश, आशियाना-ए आणि आशियाना-बी या एसआरए प्रकल्पांसंदर्भातला प्रश्न मंगळवारी हरीश पिंपळे, योगेश सागर, आशिष शेलार या सदस्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाबाबत सदस्यांनी सांगितलेली माहिती खरी मानून या प्रकल्पांची पूर्ण चौकशी करण्यात येईल तसेच याबाबत सविस्तर बैठकही लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन या वेळी वायकर यांनी दिले.
‘ओमेगा कंपनीसंदर्भात चौकशी करू’
परळ, शिवडी येथील ओमेगा इन्व्हेस्टमेंट कंपनीने अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरू केल्यासंदर्भात पूर्ण चौकशी करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. डॉ. अनिल बोंडे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
>नदीपात्रात कचरा न टाकण्याचे तत्काळ आदेश देऊ - मुख्यमंत्री
रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात कचरा टाकला जाऊ नये, असे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. कुंडलिका नदीत कचरा टाकून पात्र बुजविण्यात येत असल्याबाबतचा
प्रश्न विधानसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित केला होता.सदस्यांनी विधानसभेत दिलेली माहिती खरी मानून याबाबत तत्काळ सूचना देण्यात येतील. याशिवाय आता राज्य शासनामार्फत डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देण्यात येत नसून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या नगरपालिकांच्या प्रकल्पांना अनुदान देण्यात येत आहे. नदीसंवर्धन योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येते. तथापि, रोहा नगर परिषदेने कुंडलिका नदीघाट सुशोभीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर केला असून, या प्रस्तावाची छाननी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.