मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण
By Admin | Updated: September 20, 2016 03:25 IST2016-09-20T03:25:35+5:302016-09-20T03:25:35+5:30
स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला

मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोमवारी याबाबतची पत्रकार परिषद पार पडली. मतदार याद्यांबाबत कोणत्या राजकीय पक्षांच्या काही हरकती आहेत का? तसेच या कार्यक्र माबाबत त्यांच्यामध्येही जागृती करण्यासाठी जिल्हा स्तरावरील पक्ष प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. परंतु त्या बैठकीला बहुतांश सर्वच पक्ष प्रमुखांनी दांडी मारली. १८ सप्टेंबर (रविवार) आणि १९ आॅक्टोबर (रविवार) या सुटीच्या दिवशी देखील विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०१७ रोजी ज्या नागरिकाचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्याचप्रमाणे ज्याचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही, असे नागरिक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास पात्र असल्याचे मलिकनेर यांनी सांगितले. जिल्ह्यातील दोन हजार ४९३ मतदान केंद्रांवर मतदार याद्यांच्या दोन प्रती माहितीकरिता देण्यात आल्या आहेत. त्याबाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांनी नोंदवावेत, असे आवाहन मलिकनेर यांनी केले. ज्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असेल, तर त्यांनी तातडीने ते नोंदवून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी दांडी मारली. शेकापचे अनंतराव देशमुख, चेंढरे सरपंच परेश देशमुख हेच हजर होते. (प्रतिनिधी)
पूर्ण झालेली कामे
१६ सप्टेंबर रोजी प्रसिध्द मतदार यादीनुसार जिल्ह्यात २० लाख ४२ हजार ८६१ मतदार नोंदणीकृत आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ९० टक्के मतदारांपैकी ८७ टक्के मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे काम पूर्ण, कर्जतमध्ये ९७ टक्के मतदारांपैकी ९६ टक्के फोटोचे काम पूर्ण, उरण ९६ टक्के मतदारांपैकी ९५ टक्के फोटो, पेण ९४ पैकी ९३ टक्के फोटो, अलिबाग ९६ ंपैकी ९५ टक्के फोटो, श्रीवर्धन ९७ पैकी ९७ टक्के फोटो, महाड ९५ टक्के मतदारांपैकी ९४ टक्के फोटोचे काम पूर्ण झाले आहे.