पीक नुकसानाला सुधारित विम्याचे ‘कवच’

By Admin | Updated: July 7, 2016 02:03 IST2016-07-07T02:03:51+5:302016-07-07T02:03:51+5:30

नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतक-यांना संरक्षित रकमेत भरघोस भरपाईची हमी; ३१ जुलै अंतिम मुदत.

Revised Insurance's 'Armor' for Crop Damage | पीक नुकसानाला सुधारित विम्याचे ‘कवच’

पीक नुकसानाला सुधारित विम्याचे ‘कवच’

संतोष वानखडे / वाशिम
नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना आता सुधारित पीक विमा योजनेतून भरघोस भरपाईची हमी मिळाली असून, या योजनेत ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि पिकांवरील कीड, रोगराईमुळे शेतकर्‍यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन घेता येत नाही. उत्पादनात घट झाल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. परिणामी, शेतकर्‍यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या तुलनेत आता नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, शेतकर्‍यांना भरावयाचा विमा हप्ताही कमी करण्यात आला आहे.
खरीप हंगामात विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, रब्बी हंगामात १.५ टक्के आणि कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के अशी विमा हप्त्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली. पूर्वी सोयाबीन या पिकासाठी भरपाईची रक्कम हेक्टरी १६ हजार रुपये अशी होती. २0१६ पासून सदर रक्कम ३६ हजार अशी करण्यात आली असून, विमा हप्ता ७२0 रुपये निश्‍चित करण्यात आली. खरीप ज्वारीसाठी हेक्टरी पीक संरक्षित रक्कम २४ हजार असून, शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता ४८0 रुपये असा आहे. याप्रमाणे तूर पिकासाठी हेक्टरी संरक्षित रक्कम २८ हजार असून विमा हप्ता ५६0 रुपये आहे. मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी संरक्षित रक्कम १८ हजार असून हप्ता ३६0 रुपये, भुईमुगसाठी संरक्षित रक्कम ३0 हजार असून हप्ता ६00 रुपये, सूर्यफूलसाठी संरक्षित रक्कम असून २२ हजार रुपये असून हप्ता ४४0 रुपये, कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ३६ हजार असून हप्ता १८00 व कांदा पिकासाठी संरक्षित रक्कम ५0 हजार असून हप्ता २५00 रुपये आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविता येणार आहे. दरम्यान, ही नवीन विमा योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी वाशिमच्या कृषी विभागाने जनजागृती सुरू केली आहे.

Web Title: Revised Insurance's 'Armor' for Crop Damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.