लोकमत न्युज नेटवर्क, नाशिक: भोंदू अशोक खरात याने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला असून, धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकचे पावित्र्य भंग केले आहे. एसआयटी या प्रकरणाचा चौफेर तपास करत आहे. भोंदूसह त्याला मदत करणाऱ्या सर्वांनाच शिक्षा होईल; मात्र ज्या महसूल अधिकाऱ्यांनी त्याला ज्या पद्धतीने गैरकारभारात आपल्या पदाचा गैरवापर करून मदत केली आहे, त्या सर्वांनाच घरी जावे लागेल, असा थेट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. ४) दिला.
भोंदूगिरी करत मृत्यूची भीती दाखवून, अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयित अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. एसआयटीकडून त्या प्रकरणी चौफेर असा सखोल तपास केला जात आहे. यामुळे हे अत्यंत संवेदनशील असे प्रकरण असून हा तपाससुद्धा संवेदनशील आहे, म्हणून मीडिया ट्रायल याबाबतीत कोणीही न करणे योग्य राहील. यामुळे तपासी यंत्रणेवर विनाकारण दबाव तयार होतो, असेही बावनकुळे म्हणाले. अंजली दमानिया असोत किंवा अन्य कोणीही नागरिक असो; ज्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती असेल, त्यांनी ती नि:संकोचपणे एसआयटी किंवा नाशिक पोलिसांकडे पोहोचवावी, जेणेकरून तपासाला मदत होईल, असेही आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालय अत्यंत संवेदनशीलतेने व गंभीरपणे या प्रकरणाकडे बघत आहे. एसआयटीला तपासाकरिता संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत; यामुळे या प्रकरणात कोणीही दोषी सुटणार नाही, असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.
शिर्डीच्या शेतकऱ्याला न्याय देणार
शिर्डीच्या ज्या शेतकऱ्याची भोंदू खरात याने जमीन बळकावली आहे, त्या शेतकऱ्याला महसूलमंत्री या नात्याने मी न्याय मिळवून देईन, असेही बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात खरातने फसवणूक केल्याप्रकरणीही पोलिसांनी काही साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
सिन्नरच्या पतसंस्थेत खरातचे ‘कारनामे’
भोंदूबाबा खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता अधिक गडद होऊ लागले आहेत. सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्थेत खरातने ठेवी ठेवण्यासाठी तब्बल ३२ खाती उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व खाती खरात स्वतःच ऑपरेट करत असल्याची कबुली पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने दिली आहे. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलिस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी शनिवारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा सविस्तर जबाब नोंदवला. खरातने स्वतःच ३२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर या संस्थेत सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे २०२४ मध्ये त्याने या सर्व रकमा काढूनही घेतल्या. ही सर्व खाती खरातच हाताळत होता.
Web Summary : Minister Bawankule warns revenue officials aiding fraudster Ashok Kharat will be punished. Kharat exploited women, prompting an SIT investigation. Officials misused power to help Kharat. Shiridi farmer will get justice. Kharat opened 32 accounts in Sinnar bank.
Web Summary : मंत्री बावनकुले ने चेतावनी दी है कि फर्जी अशोक खरात की मदद करने वाले राजस्व अधिकारियों को दंडित किया जाएगा। खरात ने महिलाओं का शोषण किया, जिससे एसआईटी जांच शुरू हुई। अधिकारियों ने खरात की मदद के लिए सत्ता का दुरुपयोग किया। शिरडी के किसान को न्याय मिलेगा। खरात ने सिन्नर बैंक में 32 खाते खोले।