मारिया यांचा गृह विभागाकडे खुलासा
By Admin | Updated: June 23, 2015 02:33 IST2015-06-23T02:33:46+5:302015-06-23T02:33:46+5:30
फरार ललित मोदी यांची २०१४ साली लंडनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी

मारिया यांचा गृह विभागाकडे खुलासा
डिप्पी वांकाणी, मुंबई
फरार ललित मोदी यांची २०१४ साली लंडनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी यासंदर्भात गृह विभागाकडे खुलासा सादर केला. गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला असून यासंदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, या खुलाशात मारीया यांनी गृह विभागाचे माजी अतिरिक्त सचिव अमिताभ राजन हेही परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडन दौऱ्यावर आले होते, असे नमूद केले आहे. स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांना मारिया यांनी १७ जुलै रोजी एक व्याख्यान दिले होते. यावेळीच मारीया यांची मोदींशी संक्षिप्त भेट झाली होती. लंडनहून परतल्यानंतर खंडणीविरोधी विभागालाही या भेटीचा तपशील सादर केल्याचे मारिया यांनी खुलाशात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘मला आताच मारीया यांच्याकडून खुलासा प्राप्त झाला आहे. मात्र, सध्या याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अद्याप मी हा खुलासा पाहिला नाही,’ अशी माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.
गेल्या शनिवारी माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र माध्यमात आल्यानंतर मारीया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसूली संचालनालयात मोदीविरुद्ध सुमारे १६ तक्रारी प्रलंबित असून अशा तो सध्या लंडनमध्ये आहे. माध्यमात वृत्त झळकल्यानंतर मारीया यांनी तत्वरीत निवेदन जारी करून आपण अधिकृत लंडन दौऱ्यावेळी ललित मोदी यांच्या वकीलाची भेट घेतल्याचे सांगितले. एका परिषदेला गेल्यानंतर आपली मोदींशी काही काळ भेट झाल्याची कबुलीही त्यांनी या निवेदनात दिली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदी यांना भारत सरकारकडून पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे याआधीचे आरोपांच्या चक्रात सापडले आहेत.
ललित मोदीने अंडरवर्ल्डपासून आपले संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली होती. मात्र, आपल्या अधिकारक्षेत्रात हा मुद्दा येत नसून यासंदर्भात तक्रार दाखल करायची असल्यास मुंबईला यावे, असे आपण मोदींना सांगितल्याचे मारिया यांनी निवेदनात सांगितले.