देशव्यापी संपातून शासकीय कर्मचा-यांची माघार

By Admin | Updated: August 31, 2016 22:11 IST2016-08-31T22:11:15+5:302016-08-31T22:11:15+5:30

देशातील प्रमख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. संपातून माघार घेत

Retirement of government employees from nationwide strike | देशव्यापी संपातून शासकीय कर्मचा-यांची माघार

देशव्यापी संपातून शासकीय कर्मचा-यांची माघार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ -  देशातील प्रमख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. संपातून माघार घेत असलो, तरी संपाला नैतिक पाठिंबा राहील, अशी भूमिका बुधवारी महासंघाने स्पष्ट केली. 
महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण, कंत्राटी कामगार, शेतक-यांच्या आत्महत्या या प्रश्नांसाठी केंद्रीय कामगार संघटना संपावर जात आहेत. या मागण्यांना शासकीय कर्मचारी महासंघाचा नैतिक पाठिंबा आहे. मात्र कामगार कायद्यातील बदलाबाबत राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. शिवाय महासंघाचे केंद्रीय
प्रतिनिधी संसदेमध्ये यासंदर्भात जाब विचारणार आहेत. तोपर्यंत संपाची आवश्यकता नसल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 
तूर्तास तरी या संपामध्ये राजकारण दिसत असल्याचे मत महासंघाने व्यक्त केले आहे. शिवाय गरज पडल्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात महासंघ बेमुदत संपात उतरेल, असा इशाराही महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांनी दिला आहे. तोपर्यंत शासकीय कर्मचा-यांनी संप पुकारून विनाकारण सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

अधिका-यांचाही पाठिंबा
शासकीय कर्मचा-यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही संपात सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र देशातील कामगार संघटनांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली. राज्यातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करण्याचे आवाहनही कुलथे यांनी केले आहे.

 

Web Title: Retirement of government employees from nationwide strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.