सेवानिवृत्त उपशिक्षणाधिका-याचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: May 5, 2016 03:15 IST2016-05-05T02:51:34+5:302016-05-05T03:15:00+5:30
अकोल्यातील तरणतलावात पोहताना हृदयविकाराचा धक्का.

सेवानिवृत्त उपशिक्षणाधिका-याचा बुडून मृत्यू
अकोला : वसंत देसाई स्टेडियममधील शासकीय तरणतलावामध्ये बुडून सेवानवृत्त उपशिक्षणाधिकारी सूर्यकांत कोरटकर यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. पोहताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला असावा, असा अंदाज वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा परिषदेचे सेवानवृत्त उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून सेवानवृत्त झालेले सूर्यकांत कोरटकर हे वसंत देसाई स्टेडियमवरील तरणतलावामध्ये पोहण्यासाठी जात होते. दररोज सकाळच्या सत्रात ७ ते ८ या वेळेत ते पोहत असत. बुधवारी सकाळी तरणतलावामध्ये पोहत असताना, त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या आजूबाजूला पोहत असलेल्यांना हा प्रकार सुरवातीला लक्षात आला नाही; मात्र, ते पाण्यात बुडाल्यानंतर तरणतलावावर उपस्थित असलेल्या इतर नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढून, रेल्वे स्टेशन परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.