निवृत्त न्यायाधीश तातेड यांचे निधन
By Admin | Updated: May 6, 2015 04:11 IST2015-05-05T23:40:21+5:302015-05-06T04:11:52+5:30
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. डी. तातेड यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

निवृत्त न्यायाधीश तातेड यांचे निधन
मुंबई : उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. डी. तातेड यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव न्या. के. तातेड असून तेही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.
तातेड हे मुंबईतील नरीमन पॉईंट येथील समता बिल्डींगमध्ये वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास तातेड यांना हदयविकाराचा तिव्र झटका आला व त्यांचे निधन झाले. उद्या बुधवारी त्यांच्या पार्थिवावर गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
बुलढाणा जिल्ातील किणगाव जटू येथे २७ जुलै १९२७ रोजी तातेड यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले तातेड हे निरंतर अभ्यास करून जिल्हा न्यायाधीश झाले. अकोला, यवतमाळ व बीड येथे त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र शासनाचे विधी सचिव म्हणून निवड झाली. विधी सचिवाचे कर्तव्य पार पाडत असताना तातेड यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली. १९९० साली ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
गेली ३५ वर्षे त्यांनी अविरत विधी सेवा केली. तातेड यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. निवृत्त झाल्यानंतर तातेड यांनी यवतमाळ येथील लोही गावात ५० खाटांचे रूग्णालय उभारले.