‘धुळ’वडीचा मच्छिमारीवर परिणाम
By Admin | Updated: April 7, 2015 01:25 IST2015-04-06T23:31:47+5:302015-04-07T01:25:34+5:30
सौदीतील वादळाचे परिणाम : वाहतुकीची गती मंदावली; समुद्रावर धुलिकणांचा मोठा पट्टा

‘धुळ’वडीचा मच्छिमारीवर परिणाम
मालवण/वैभववाडी : सहा दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या वाळवंटात घडलेल्या वादळाचा फटका सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर बसला आहे. गेले दोन दिवस सिंधुदुर्गच्या वातावरणात वाळूच्या कणांचा थर पसरला आहे. समुद्रावर धुलिकणांचा पट्टा मोठ्या प्रमाणावर पसरल्याने त्याचा परिणाम मच्छिमारीवर झाला आहे. या धुळवडीमुळे सिंधुदुर्ग किल्ला दर्शन प्रवासी होडी वाहतूकही काहीकाळ बंद होती.दरम्यान, या धुळवडीमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा, काजू बागांना धुळीचा फटका बसणार आहे. आंबा-काजूंना या धुळवडीमुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. १ एप्रिल रोजी सौदी अरेबियातील वाळवंटात वादळ झाल्याने नैऋत्य दिशेकडून आलेले हे वादळ पूर्वेकडे सरसावले. या वादळामुळे वातावरणात उडालेली प्रचंड धूळ वाऱ्यासोबत हजारो सागरी मैल पार करून भारताच्या किनाऱ्यावर आली. गेले दोन दिवस वातावरणात धुळीचा प्रचंड थर निर्माण झाला असून, मालवणच्या किनारपट्टीवरून दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला काही काळ दिसेनासा झाला होता. तसेच मच्छिमारी करणाऱ्या बोटीही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सूर्याेदयापूर्वी सह्याद्रीचा पट्टा धूरकट बनला होता. धुळीचा सर्वाधिक प्रभाव घाटमार्गात जाणवला. त्यामुळे वाहतुकीची गती काहीशी मंदावली होती. सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणातील धुळीचा थर कायम होता. धुळीचा आरोग्यावर परिणाम होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात होत्या. भरदुपारी धुकेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र उकाडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे जनतेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसले. (प्रतिनिधी)
लांजा, रत्नागिरीत हवेत ‘धुळ’वड
रत्नागिरी/लांजा : आखाती देशात उसळलेल्या धुळीच्या वादळाचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दिसून आला. सोमवारी सकाळपासून संपूर्ण लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात हवेत सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसत होते. रविवारी रायगड जिल्ह्यात धुळीचे लोळ उठल्यानंतर त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तालुक्यांतही दिसून आला. सोमवारी सकाळपासून अचानक संपूर्ण वातावरण धुक्याप्रमाणे जाणवत होते. सध्या भाजावळीचा हंगाम असल्याने शेतामध्ये भाजावळ सुरू असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दिवसभर हवेतील धुळीचे प्रमाण कायम होते. लांजा आणि रत्नागिरी तालुक्यातच हा प्रकार अधिक दिसून आला. आखाती देशात झालेल्या धुळीच्या वादळानंतर गेले दोन दिवस अरबी समुद्रकिनारी असलेल्या भागात कोकणपट्ट्यात वाऱ्याचा वेग वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत रविवारी केवळ वाऱ्याचा वेग वाढलेला होता. मात्र, सोमवारी रत्नागिरी शहर आणि कुवारबाव भागात पूर्ण धुक्यासारखेच वातावरण होते. दिवसभर असेच वातावरण होते. (प्रतिनिधी)
धुलिकणांमुळे दृश्यता कमी
वातावरणात वाळूचे कण
वातावरणात पसरलेले वाळूचे कण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी तसेच गुजरातच्या किनारपट्टीनजीक वाहून आले आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून नाशिक, नंदूरबार, नगर, मुंबई, ठाणे, वाशी, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रावरील वातावरणात वाळूच्या कणांचा दाट थर जमा झाला.
कीटकांची संख्या घटणार
पुणे : धुळीच्या वादळामुळे पिकांच्या, वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणावर, पर्यायाने वाढीवर किंचित परिणाम होईल. कीटकांच्या श्वसनरंध्रांत धुळीचे कण जाऊन ते मृत्युमुखी पडल्याने त्यांची संख्या कमी होऊ शकते, असे वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
/ वृत्त पान ४
वाळूच्या वादळाचा जोर आणखी वाढणार !
मुंबई : आखाती देशांत उठलेले वाळूचे वादळ रविवारी मुंबईसह राज्याच्या इतर भागांत दाखल झाले आहे. या वादळाच्या कणांचा प्रभाव सोमवारी कमी झाला असला, तरी मंगळवार व बुधवारी त्यांचा जोर आणखी वाढेल, अशी भीती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
परिणामी आणखी दोन दिवस हे वादळ घोंघावणार असून, त्याने नागरिकांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या आठवड्यातील गुरुवारी दुबईमध्ये वाळूचे वादळ उठले. या वादळाने येथील जनजीवन विस्कळीत केले. ज्या वेगाने हे वादळ उठले, त्याच वेगाने ते शमलेदेखील.