कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपरिषदेची
By Admin | Updated: July 20, 2016 02:31 IST2016-07-20T02:31:59+5:302016-07-20T02:31:59+5:30
पनवेल शहरात तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे .

कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपरिषदेची
पनवेल : पनवेल शहरात तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे . याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाजीपाला वितरीत करण्यात येतो. याठिकाणची खराब भाजी व कचऱ्याची विल्हेवाट गाढी नदीच्या पात्रात लावली जात होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १ जून रोजी ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचऱ्याची विल्हेवाट गाढी नदीच्या पात्रात’ या मथळ्याखाली बातमी छापली होती. त्या बातमीचे पडसाद मंगळवारी नगरपरिषदेच्या स्थायी समितीत पडलेले पहावयास मिळाले.
नगरपरिषदेने याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस बजावली होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला बजावलेली नोटीस चुकीची असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचा मुद्दा पनवेल नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी लोकमतने छापलेल्या बातमीचा अंक पाटील यांनी सभागृहात फडकवला. ते म्हणाले, महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमनुसार नगरपरिषद हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट नगरपरिषदेने लावणे गरजेचे आहे. असे असताना नगरपरिषद आपली जबाबदारी झटकून कृषी उत्पन्न समितीला कशी काय नोटीस बजावू शकते? नगरपरिषदेकडून गुजराती स्मशानभूमी याठिकाणी कचरा टाकत येत असून हेही चुकीचे आहे. ही जागा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरक्षित नसताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीला बजावलेली नोटीस ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.