अमेरिकेतही मराठी नाटकांना प्रतिसाद
By Admin | Updated: March 3, 2015 00:28 IST2015-03-03T00:22:15+5:302015-03-03T00:28:28+5:30
अभिजित पराडकर : कोल्हापूरच्या युवकांनी सादर केली २२ नाटके

अमेरिकेतही मराठी नाटकांना प्रतिसाद
कोल्हापूर : अमेरिकेत शिकायला गेल्यावर मी स्थापन केलेल्या ‘नाट्यगंधार’ या हौशी नाट्यसंस्थेने आतापर्यंत अमेरिकेतील विविध बावीस ठिकाणी अनेक मराठी नाटकांचे प्रयोग सादर केले आहेत. त्याला अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली, असे ‘नाट्यगंधार’चे प्रमुख अभिजित पराडकर यांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक असलेले पराडकर कोल्हापुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पराडकर म्हणाले, मी मूळचा कोल्हापूरचा. विद्यापीठ हायस्कूल येथे शालेय, तर विवेकानंद महाविद्यालय येथे अकरावी-बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर वारणानगर येथे इंजिनिअरिंग केले. त्यानंतर स्टेट युनिव्हर्सिटी आॅफ न्यूयॉर्कमध्ये एम.एस. करून अमेरिकेत डेट्रॉइटला स्थायिक झालो. गणेशोत्सव दिवशी अमेरिकेत आम्ही नाटक करायचे ठरविले आणि एक हिंदी नाटक केले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आम्ही पु. ल. देशपांडे यांचे ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक केले. येथील प्रेक्षकांनी या नाटकास चांगली दाद दिल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळाले. फक्त हौसेसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. यामध्ये अनेक अधिकारी, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणीसुद्धा आमच्यासोबत काम करतात.
आम्ही आता तब्बल २२ नाटके केली आहेत. अमेरिकेतील विविध भागात त्याचे ५० प्रयोग झाले आहेत. या सर्व नाटकांत महाराष्ट्र, बंगालसह अन्य राज्यांतील या ठिकाणी स्थायिक असलेले लोक काम करतात. या मराठी नाटकामुळे येथील स्थायिक लहान मुलांना मराठी भाषा समजू लागली आहे आणि ते मराठीत बोलू लागली आहेत, हे वैशिष्ट्य.