सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली
By Admin | Updated: February 21, 2015 02:58 IST2015-02-21T02:58:02+5:302015-02-21T02:58:02+5:30
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते.

सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली
मुंबईत शोकसभा : आठवणींनी भावनेचा बांध फुटला, आबांनी केलल्या संघर्षाला, कष्टाला अन् सचोटीला सलाम
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते. आबांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली असून, नजीकच्या काळात ती भरून निघणे अशक्य आहे, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआयसह सर्वच पक्षांचे नेते शोकसभेला उपस्थित होते.
मोठ्या कष्टातून राज्यातील ग्रामीण भागात एखादे व्यक्तिमत्त्व घडावे, त्याला लोकांची मान्यता मिळावी आणि त्याचवेळी ती व्यक्ती अवेळी आपल्यातून निघून जावी, असे हे भेसूर चित्र आहे. अवघ्या ५७-५८ वर्षांच्या आबांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहण्याच्या प्रसंग येईल असे वाटले नव्हते, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सातवीत जिल्ह्यात प्रथम, दहावीत विभागात प्रथम आणि बीए परीक्षेत सांगलीत सर्वप्रथम येत त्यांनी शिक्षण पूर्ण केल्याची आठवण पवार यांनी सांगितली.
शांतीनिकेतन महाविद्यालयात माझे भाषण आयोजित करण्यात आले होते. मात्र कोणत्याही मंत्र्याला कॉलेजमध्ये बोलवायचे नाही, ही आमची भूमिका असल्याचे सांगत आबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाला विरोध केला होता, असे पवार यांनी नमूद केले.
कमवा आणि शिका योजनेतून मिळणारी रक्कम दुप्पट करण्याच्या अटीवरच आबांनी कार्यक्रमाला मंजुरी दिली होती, असे पवार यांनी सांगताच आबांच्या मुत्सद्दीपणावर उपस्थित भावूक झाले.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महसूल मंत्री एकनाथ खडसे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे आदींनी आबांना श्रद्धांजली वाहिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि ‘लोकमत’चे एडिटर-इन- चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आबांच्या कष्टला, संघर्षाला अन् सचोटीला सलाम केला. (प्रतिनिधी)
भाजपाच्या मंत्र्यांनी शब्द पाळला!
च्तंबाखू सोडा, प्लीज... मला वचन द्या..., असे म्हणत आबांनी भाजपाचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा हात हातात घेतला होता. त्या आठवणीने व्यथित होत मेहतांनी जाहीर शोकसभेत आबांच्या फोटोसमोर खिशातल्या तंबाखूच्या पुड्या ठेवल्या आणि आजपासून आपण तंबाखू सोडली, असे जाहीर केले.
च्ते म्हणाले, विधानसभेत मी आणि आबा एकाचवेळी आलो. त्या वेळी मी, सुधीर मुनगंटीवार, नवाब मलिक, बाळा नांदगावकर, आबा अशा पाच-सहा जणांचा ग्रुप होता. आम्ही दरवेळी तंबाखू खाताना आता सोडायची, असे एकमेकांना बजावत असू. मात्र काहींची सुटली.. काहींची नाही. आबांचा आजार वाढला तसे मी त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. मला पाहून आबा म्हणाले, ‘‘प्रकाशभाई एक वचन द्या, तंबाखू सोडा.’’ त्यांनी माझा हात हातात घेतला, म्हणाले, ‘‘प्लीज.. प्लीज, सोडा ती तंबाखू.’’ मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून भरून आले.
च्४० वर्षांची सवय अशी सुटणार नाही, पण आज मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने तंबाखू सोडतो. माझ्या खिशातल्या पुड्या आबांच्या फोटोपुढे ठेवतो, असे म्हणत मेहता खिशातल्या पुड्या घेऊन फोटोपुढे गेले. तेथे त्यांनी पुड्या ठेवल्या !