प्रस्तावित रिंगरूट मार्गाला विरोध

By Admin | Updated: June 9, 2016 04:31 IST2016-06-09T04:31:52+5:302016-06-09T04:31:52+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रस्तावित रिंगरूट मार्गाला डोंबिवली पूर्वेकडील कोपर परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Resistance to the proposed ringtone route | प्रस्तावित रिंगरूट मार्गाला विरोध

प्रस्तावित रिंगरूट मार्गाला विरोध


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रस्तावित रिंगरूट मार्गाला डोंबिवली पूर्वेकडील कोपर परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. रिंगरूट मार्गांतर्गत केले जाणारे रुंदीकरण त्वरित रद्द करावे, अन्यथा बेमुदत उपोषण छेडावे लागेल, असा इशारा काँग्रेसच्या माजी नगरसेविका शारदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी केडीएमसी मुख्यालयावर काढलेल्या मोर्चात ग्रामस्थांनी दिला.
कोपरगावातील गावठाण क्षेत्र ८० ते ९० वर्षांपासून वसलेले आहे. या गावाच्या बाहेरून दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ते रिंगरूटसाठी वापर होण्यासारखे आहेत. परंतु, गावातून रस्ता काढण्याचे केडीएमसीने ठरवल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. रिंगरूट मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी कोपर गावातील रस्ता रुंदीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बुधवारी कोपरगाव बचाव समितीद्वारे ग्रामस्थांनी माजी नगरसेविका पाटील यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी मुख्यालयावर धडक देत रिंगरूटला विरोध दर्शवला.
हजार, बाराशे घरे होणार उदध्वस्त : रिंगरूट मार्ग हा गावठाण भागातून जात असल्याने १०००-१२०० घरे उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामस्थांचे नुकसान होत असेल तर याला आमचा विरोध कायम राहील, असे पाटील यांनी सांगितले. यावर रवींद्रन यांनी संबंधित परिसराचा दौरा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Web Title: Resistance to the proposed ringtone route