मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची स्मारके उभारण्याऐवजी गरिबांसाठी इस्पितळे उभारा, अशा शब्दांत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी विरोध दर्शविला. भाजपा, शिवसेनेने त्यांच्या भूमिकेवर तातडीने सडकून टीका केली. जलील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य सरकारचा पैसा अशा स्मारकांवर खर्च करण्याची गरज नाही. त्याऐवजी जनहिताची कामे झाली पाहिजेत. आज ही स्मारके उभारली तर उद्या आणखी स्मारकांची मागणी होऊन ही साखळी सुरूच राहील. स्मारकांविरुद्ध कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचे खा. संजय राऊत यावर म्हणाले की, एमआयएमकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ज्यांच्या स्मारकांना एमआयएम विरोध करीत आहे त्यांनी देश आणि समाज जोडण्याचे काम केले आहे. एमआयएम देश तोडण्याची भाषा करते. महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले, राज्यातील लाखो लोकांच्या भावना या स्मारकांशी जोडल्या गेल्या आहेत. इतिहास घडविणाऱ्या नेत्यांची स्मारके समाजासाठी प्रेरणादायी असतात. एमआयएमचा विरोध अनाठायी आहे. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील स्मारकांना विरोध
By admin | Updated: June 7, 2015 01:41 IST