निवासी डॉक्टरांना अखेर वेतनवाढ
By Admin | Updated: January 6, 2016 01:42 IST2016-01-06T01:42:32+5:302016-01-06T01:42:32+5:30
राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांना अखेर पाच महिन्यांनी विद्यावेतनात वाढ देण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले

निवासी डॉक्टरांना अखेर वेतनवाढ
मुंबई: राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांना अखेर पाच महिन्यांनी विद्यावेतनात वाढ देण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट्स डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने, जुलै २०१५ मध्ये विद्यावेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी मासबंक केला होता.
दर तीन वर्षांनी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, असा नियम आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून निवासी डॉक्टरांचे वेतन ५ हजार रुपयांनी वाढणे अपेक्षित होते, पण तसे झाले नव्हते. अखेर नवीन वर्षात निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढणार असल्याने निवासी डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला आहे.
२ जुलै रोजी केलेल्या मासबंकमध्ये विद्यावेतन वाढीची मागणी मार्डतर्फे करण्यात आली होती. त्या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर ३ जुलै २०१५ रोजी झालेल्या बैठकीत तावडे यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्या वेळी १ आॅगस्टपासून वेतनवाढ मिळेल, असेही सांगितले होते. त्यानंतर नाव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा आश्वासन मिळाले होते. अखेर आज पुढच्या महिन्यापासून वेतवाढ मिळणार असल्याचे तावडे यांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)