निवासी डॉक्टरांचा संप चर्चेनंतर मागे

By Admin | Updated: August 28, 2014 02:07 IST2014-08-28T02:07:40+5:302014-08-28T02:07:40+5:30

मागील तीन दिवसांपासून मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मिटला. बुधवारी दुपारी २.३० वाजता सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले.

Resident doctor back after discussions | निवासी डॉक्टरांचा संप चर्चेनंतर मागे

निवासी डॉक्टरांचा संप चर्चेनंतर मागे

पाच सुरक्षा गार्ड निलंबित : आकस्मिक विभागाची सुरक्षा वाढली
नागपूर : मागील तीन दिवसांपासून मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मिटला. बुधवारी दुपारी २.३० वाजता सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. बुधवारी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्यासोबत निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा चर्चा झाली. या चर्चेत अधिष्ठात्यांनी मार्डच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मार्डने संप मागे घेण्यात आला.
अधिष्ठात्यांनी रविवारी रात्री आकस्मिक विभागात तैनात युनिटी सिक्युरिटीच्या पाच सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. घटनेच्या दिवशी सुरक्षा गार्ड हे मूकदर्शक असल्याचा आरोप मार्डने केला होता. प्रकरण गंभीर असतानाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही. त्याचप्रमाणे आकस्मिक विभागात मॅस्कोचे १२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात महिला सुरक्षा गार्डचाही समावेश आहे. यासोबतच आकस्मिक विभागात व्हेंटिलेटरयुक्त पाच खाटांचा रिकव्हरी कक्ष तयार करण्यात आला आहे. ईसीजी मशीन संचालित करण्यासाठी टेक्निशियन राहतील. सोनोग्राफी मशीन व एक्स-रे मशीनचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. गेटपास व्यवस्था सक्तीने लागू करण्याची मागणी मार्डने केली असून, अधिष्ठात्यांनी ती मागणी मान्य केली आहे.
मार्डचे अध्यक्ष डॉ. आयुध मगदुम यांनी सांगितले की, लिखित आश्वासनानंतरच निवासी डॉक्टर कामावर परतले आहेत. जर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा संप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टचे लागणार पोस्टर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे डॉक्टरांशी वाद घालू नयेत, यासाठी रुग्णालयात ठिकठिकाणी डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टसंबंधीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. यात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कुठली कारवाई केली जाऊ शकते, याच्या माहितीचा उल्लेख करण्यात येईल.
समितीचा अहवाल सादर
मेडिकलमधील आकस्मिक विभागात रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक आणि निवासी डॉक्टर्स यांच्यात मारहाण झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले. मेडिकल प्रशासनानेसुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीने बुधवारी सकाळी आपला अहवाल प्रशासनाकडे सोपविला. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही तेवढेच दोषी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Resident doctor back after discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.