रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण

By Admin | Updated: August 1, 2016 04:24 IST2016-08-01T04:24:44+5:302016-08-01T04:24:44+5:30

रुग्णाच्या नातेवाईकांनी ससून शासकीय रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी रात्री बेदम मारहाण केली.

Resident doctor assaulted relatives of the patient | रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण

रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण


पुणे : डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी ससून शासकीय रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना शनिवारी रात्री बेदम मारहाण केली. गेल्या वर्षभरातील राज्यातील ही १२ वी घटना असून, यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. रमेश भिसे, राहुल परदेशी, अविनाश जाधव, रोहन साळवे व विकी गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे मार्डच्या डॉक्टरांनी रुग्णालयात कामबंद आंदोलन पुकारले असून, तातडीच्या सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे मार्डचे पुण्याचे सचिव डॉ. कान्हाराम पटेल यांनी सांगितले.
तानाजी कोंडीबा सकट (४३) यांना शुक्रवारी छातीत दुखत असल्याने ससूनमधील वॉर्ड क्र. १४ मध्ये डॉ. वसुधा सरदेसाई यांच्या विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावत चालल्याची कल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना वेळोवेळी दिली होती. मात्र, शनिवारी रात्री रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉ. अभिजित जवंजाळ व डॉ. सादिक मुल्ला या निवासी डॉक्टरांना मारहाण केली. या डॉक्टरांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
पेशाने रिक्षाचालक असणाऱ्या तानाजी यांना दारू आणि तंबाखूचे व्यसन होते. त्यांना यकृताचा दीर्घकालीन आजारही असल्याने त्यांची स्थिती खालावत होती. रुग्णालयात दाखल झाले तेव्हाच त्यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर हळणोर यांचे म्हणणे आहे.
>सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्याची मागणी
याप्रकरणी सुरक्षारक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश शासकीय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. १ आॅगस्टपासून सुरक्षारक्षकांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात ४८ सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेले असून आणखी ४४ कॅमेरांची मागणी करण्यात आली असल्याचे ससून शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
माझ्या पतीचा मृत्यू हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. निवासी डॉक्टर व सुरक्षारक्षकांकडून आम्हाला जबर मारहाण करण्यात आलेली असून संबंधितांवर गुन्ह्यांची नोंद होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.
- संगीता सकट, रुग्णाची पत्नी

Web Title: Resident doctor assaulted relatives of the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.