सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 03:59 IST2017-03-02T03:59:24+5:302017-03-02T03:59:24+5:30
सायबर सुरक्षेला असलेल्या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आंतरशाखीय स्थायी समितीची स्थापना केली

सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेची समिती
मुंबई : सायबर सुरक्षेला असलेल्या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आंतरशाखीय स्थायी समितीची स्थापना केली आहे. सध्याचे तंत्रज्ञान आणि आगामी काळात येऊ शकणारे तंत्रज्ञान अशा दोन्ही संदर्भात समिती अभ्यास करणार आहे.
ही ११ सदस्यांची समिती सुरक्षाविषयक मानके आणि शिष्टाचार याचा अभ्यास समिती करेल, तसेच सायबर सुरक्षा मजबूत करण्यास योग्य धोरणात्मक हस्तक्षेपाबाबत शिफारशी करील. रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्र यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे. आणखी जाणकारांना समितीवर घेतले जाऊ शकते, तसेच विशिष्ट मुद्द्यांच्या अभ्यासासाठी उपसमित्यांची स्थापनाही होऊ शकते.
रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये देशातील सर्व बँकांसाठी सायबर सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ‘या सूचनांनंतर बँकांनी सायबर सुरक्षेसाठी पावले उचलली. तथापि, हल्ल्याचे स्वरूप ठरीव साच्यातील नसते. कुठल्याही स्वरूपात हल्ले होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.’ (वाणिज्य प्रतिनिधी)
>रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी रोजी पतधोरण आढावा जाहीर केला होता. त्या वेळी जारी करण्यात आलेल्या निवेदनात सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आंतरशाखीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते.