जि.प., पं.स.मधील आरक्षण नोव्हेंबरमध्ये
By Admin | Updated: August 21, 2016 01:25 IST2016-08-21T01:25:33+5:302016-08-21T01:25:33+5:30
राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत २५ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
जि.प., पं.स.मधील आरक्षण नोव्हेंबरमध्ये
मुंबई : राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत २५ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली.
२०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी ९ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्राची प्रभाग रचना करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवतील. विभागीय आयुक्त त्यास २३ सप्टेंबरपर्यंत मान्यता देतील.
या प्रस्तावात अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचाही समावेश असेल.
५ आॅक्टोबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठीची सोडत जिल्हाधिकारी; तर पंचायत
समिती निर्वाचक गणांसाठीची
सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात येईल. (विशेष
प्रतिनिधी)
आरक्षणाचे प्रारूप १० आॅक्टोबरला
निवडणूक विभाग व निर्वाचक गण; तसेच आरक्षणाबाबतचे प्रारूप १० आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर नागरिकांना १० ते २० आॅक्टोबर दरम्यान हरकती व सूचना जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधित विभागीय आयुक्त सुनावणी देतील. त्यानंतर ते १७ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची रचना अंतिम करतील. त्यास २५ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्धी दिली जाईल.