संशोधनातून पावणेचार कोटींचा महसूल
By Admin | Updated: October 31, 2014 00:52 IST2014-10-31T00:52:00+5:302014-10-31T00:52:00+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये फारशा सोयीसुविधा नसल्याची नेहमीच ओरड होते. ही बाब काही अंशी खरी असली तरी संशोधनाच्या बाबतीत अनेक विभागांनी कात

संशोधनातून पावणेचार कोटींचा महसूल
नागपूर विद्यापीठ : पदव्युत्तर विभाग टाकताहेत कात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये फारशा सोयीसुविधा नसल्याची नेहमीच ओरड होते. ही बाब काही अंशी खरी असली तरी संशोधनाच्या बाबतीत अनेक विभागांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षांत संशोधन तसेच ‘कन्सल्टन्सी’च्या रूपात काम करताना पदव्युत्तर विभागांनी सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची बाब समोर आली आहे. औषधीविज्ञान शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद येवले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर विद्यापीठ प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे.
विद्यापीठाच्या निरनिराळ््या पदव्युत्तर विभागांमध्ये संशोधन प्रकल्प चालतात. यासोबतच उद्योगक्षेत्रातील काही कंपन्यांसाठी तसेच विभागांसाठी ‘कन्सल्टन्सी’ म्हणूनदेखील काम पाहिल्या जाते. या माध्यमातून विभागांना महसूल प्राप्त होतो. २०११-१२ या सालात संशोधनाच्या माध्यमातून १ कोटी ७३ लाख १९ हजार ९०० रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. २०१२-१३ मध्ये हाच आकडा १ कोटी २७ लाख ८५ हजार ७०० इतका होता. २०१३-१४ मध्ये मात्र महसूल कमी झाल्याचे दिसून आले असून वर्षभरात ६९ लाख १४ हजार ५३२ रुपयेच महसूल प्राप्त झाला. संशोधनाच्या बाबतीत विज्ञानशास्त्राशी संबंधित विभागांनी आघाडी घेतली आहे. (प्रतिनिधी)
पाच वर्षांत सहा सामंजस्य करार
विद्यापीठातील विभागांचा उद्योगक्षेत्राशी थेट संपर्क यावा व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक जगतातील कामांचे स्वरूप जवळून जाणता यावे यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात विद्यापीठाने औद्योगिक संस्था, संशोधन संस्था, इतर विद्यापीठे असे मिळून सहा सामंजस्य करार केले आहेत. यात ‘नीरी’, ‘अॅनॅकॉन लॅब’, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च’, ‘एमसीईडी’ (महाराष्ट्र सेंटर फॉर एन्टरप्रेनरशीप डेव्हलपमेन्ट), देव संस्कृत विद्यापीठ, ‘झिम लॅब लिमिटेड’ यांचा समावेश आहे.
तीन वर्षांत ४८ संशोधन प्रकल्प
विद्यापीठाच्या निरनिराळ््या विभागांमध्ये मिळून गेल्या तीन वर्षांत ४८ संशोधन प्रकल्प चालविण्यात आले. तर निरनिराळ््या विषयांवरील सहा कार्यशाळा घेण्यात आल्या. पेटेंटच्या बाबतीत मात्र अजूनही फारसा उत्साह दिसत नसून गेल्या तीन वर्षांत केवळ तीन पेटेंट झाले असल्याची माहिती विद्यापीठाने सादर केली आहे.