Republican unity! Problems, Problems and Future | रिपब्लिकन ऐक्य! शक्यता, अडचणी अन् भवितव्य

रिपब्लिकन ऐक्य! शक्यता, अडचणी अन् भवितव्य

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा आणि महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आंबेडकरी राजकारण शून्यावर आले आहे. त्यामुळे एकूणच आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी तरुणवर्ग एकत्र येऊ लागला आहे. मुंबईत तर मोहल्ला-मोहल्ल्यांमध्ये तरुणांच्या बैठका होऊ लागल्या आहेत.

१६ एप्रिलला प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस दहा प्रमुख संघटनांचे नेते उपस्थित होते. त्यात आनंदराज आंबेडकर, सुरेश माने, ललित बाबर, धनाजी गुरव, विजय वाकचौरे आदी दहा प्रमुख नेत्यांनी ‘आंबेडकरी राजकारणाचा पराभव व उपाय’ या विषयावर मांडणी केली. नंतरच्या सत्रात अडीचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रश्नोत्तरे झाली. भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना वगळून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू करण्यावर एकमत झाले. प्रचलित निवडणूक पद्धतीत बदल करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, प्रमाणबद्ध निवडणूक पद्धत जर अमलात आली तर छोट्या-छोट्या पक्षांनाही नीट प्रतिनिधित्व मिळू शकते, अशी मांडणी वक्त्यांनी केली. दहा संघटनांसह आणखी काही संघटनांना एकत्र करून येत्या ११ जूनला पुढील बैठक घेण्याचे ठरले. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकाराने १ मे रोजी मुंबईत आणखी एक बैठक झाली. त्यात विविध क्षेत्रांतील मंडळींना एकत्र करून समिती गठित करावी आणि रिपब्लिकन ऐक्यासाठी या समितीने मार्गदर्शन करावे, असे ठरले. मात्र, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या ऐक्य प्रक्रियेत सामील होण्यास नकार दिला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आपले राजकीय वर्तुळ सध्या एवढे मोठे केले की, काँग्रेससारख्या मुख्य प्रवाहातील पक्षालादेखील स्थान उरलेले नाही. अशा वेळी प्रादेशिक आणि चळवळीतील पक्षांना आणि नेत्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पण हे सर्वच पक्ष व्यक्तिकेंद्रित असल्यामुळे एकीकरण वाटते तितके सोपे नाही. रिपब्लिकन पक्ष-संघटनांचे ऐक्य ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली आहे, असे गौतमीपुत्र कांबळे यांना वाटत असले तरी आंबेडकरी चळवळीतील तरुण पिढीचा ऐक्यासाठी दबाव वाढत आहे. दलित चळवळीतील पक्ष-संघटनांना जसा फुटीचा इतिहास आहे, तसा ऐक्याच्या प्रयत्नांचादेखील आहे. आजवर तीन-चारदा तसे प्रयत्न झाले. पण पुन्हा नेतृत्व आणि राजकीय पाठिंब्यावरून फटाफूट झाली. कोणत्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा द्यायचा, यावरून नेहमीच रिपाइं नेत्यांमध्ये नेहमीच मतभेद झाले. १९८९ मध्ये झालेले ऐक्य १९९० मध्ये काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यापैकी कुणाशी युती करायची यावरून फुटले. तर १९९५ चे ऐक्य १९९७ मध्ये पक्षातल्या पदवाटपावरून दुभंगले. आता पुन्हा एक पाऊल त्या दिशेने पडले आहे. यावर चळवळीतील नेत्यांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.


कोणत्याही गटात माझा पक्ष विलीन करण्याची तयारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रातील रिपब्लिकन पक्ष म्हणजे सर्व जाती-जमातींना घेऊन काम करणारा पक्ष होय. त्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि जनता या तिघांवर ऐक्य करण्याची आणि टिकविण्याची जबाबदारी आहे. केवळ नेत्यांवर दोष ठेवून चालणार नाही. नेते एकत्र आले की जनताही एकत्र येते. मात्र नेते तुटले की जनता एकत्र राहत नाही. नेत्यांचे ऐक्य झालेच पाहिजे, मात्र जनतेचे ऐक्य महत्त्वाचे आहे. ऐक्य तुटण्याचे कारण म्हणजे नेता कुणाला करायचे, हा एक प्रश्न असतो. आणि युती कोणत्या पक्षासोबत करायची, हा दुसरा प्रश्न असतो. त्यामुळे बहुमताचा निर्णय सर्वांनी मान्य केला, तर ऐक्य टिकू शकते. उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीमध्ये आरपीआयपेक्षा जास्त गट आहेत. मात्र सर्वाधिक मते मायावतींच्या पक्षालाच मिळतात. मात्र महाराष्ट्रात तसे दिसत नाही. मतांची विभागणी होते. तसे न करता जनतेने ऐक्यातून कोण नेता बाजूला होतो? किंवा कुणाची चूक आहे? याचा विचार करून मतदानाचा निर्णय घ्यायला हवा. नेते एकत्र राहत नसतील, तर बहुमताचा निर्णय मान्य करून वेगळ्या गट काढणाऱ्यांमागे जनतेने उभे राहू नये.
सध्या आरपीआयच्या कोणत्याही गटात माझा पक्ष विलीन करण्याची तयारी आहे. मग तो रा.सू. गवई यांचा रिपब्लिकन पक्ष असेल किंवा एखादा नवीन गट स्थापन करावा लागला तरी चालेल. म्हणूनच एकदा ऐक्य झाले, तर ते तुटू नये, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आहे. ऐक्यासंदर्भात सद्य:स्थितीचा अभ्यास करण्याचा अधिकार समितीला दिला असून समितीच्या मार्गदर्शनानुसार काय करता येईल? हे सर्व गटांच्या नेत्यांसोबत बोलता येईल. नुकत्याच झालेल्या ऐक्यासंदर्भातील बैठकीस कोणत्याही आरपीआय गटाच्या नेत्यांना बोलावले नव्हते. केवळ आंबेडकरवादी साहित्यिक आणि विचारवंतांना बोलावले होते. दोन-तीन महिन्यांत समितीला रिपोर्ट द्यायला सांगितले आहे. त्यानंतर इतर नेत्यांशी बोलता येईल.
समाजवादी विचारसरणीच्या लोकांनीही आरपीआयमध्ये सामील व्हावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. मात्र त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हे स्वप्न अपूर्ण राहिलेले आहे. समाजात गटबाजी झाली आहे. या ऐक्यामध्ये ओबीसी, ब्राह्मण आणि मराठा समाजालाही एकत्र घेऊन जायचे आहे. तरच पक्ष सर्वव्यापक होऊ शकेल. मी भाजपासोबत असलो, तरी आरपीआयचा प्रत्येक गट कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत आहे. त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे असतील, ते चर्चेनंतर घेता येतील. स्वबळावर लढून यश मिळत नाही, याचे अनुभव सर्वांनी घेतले आहेत. राजकीय फायद्यासाठी युती आवश्यक असली, तरी त्याआधी चर्चा महत्त्वाची असून सर्वांनी ऐक्यासाठी किमान चर्चेसाठी बसायला हवे.
- रामदास आठवले
अध्यक्ष, रिपाइं आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री


सांघिक नेतृत्वातूनच शक्य

जो पर्यंत रिपब्लिकन चळवळीमध्ये सांघिक नेतृत्व तयार होत नाही, तोपर्यंत रिपब्लिकन ऐक्य होईल, असे मला वाटत नाही. यापूर्वी ऐक्यासाठी अनेकदा प्रयत्न झालेले आहेत. वामनदादा कर्डक यांनीही यासाठी प्रयत्न केले होते.
देशात सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती वाईट आहे. मध्येच आरक्षणावर, तर कधी संविधानावर उलटसुलट चर्चा घडवून आणली जाते. बाबासाहेबांच्या विचारांचा जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचे थेट परिणाम समाजातील सर्व घटकांवर होत असतात. त्यामुळे एकसंघ चळवळ हाच एकमेव उपाय आहे. यासाठी रिपब्लिकन नेत्यांना आपले अभिनिवेश फेकून द्यावे लागतील. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञानच सर्वांना एकत्र आणू शकते. आंबेडकरी चळवळीला उज्ज्वल भवितव्य आहे. मात्र, नेत्यांनी तडजोडीचे राजकारण सोडले पाहिजे. सर्र्वच नेते कडवट आंबेडकरवादी आहेत; पण त्यांनी बाबासाहेबांचा मूळ विचार आत्मसात केलेला नाही. बाबासाहेबांच्या स्वाभिमान, संघटन, संघर्ष आणि स्वावलंबन या विचारांकडे राजकीय नेत्यांचे लक्ष नाही. ही चारही सूत्रे समाजात रुजली पाहिजेत. त्यामुळे नेत्यांनी आपले अभिनिवेश बाजूला टाकून बाबासाहेबांच्या मूळ रिपब्लिकन पक्षात सहभागी होणे, हेच सामाजिक व राजकीय चळवळीसाठी हिताचे राहील.
- डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ विचारवंत


राजकीय अस्तित्व संकटात आल्यानेच ऐक्याची भाषा

रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी भूमिका आम्ही यापूर्वी अनेकदा मांडली आहे. परंतु रामदास आठवले हे मात्र जेव्हा त्यांचे राजकीय अस्तित्व संकटात येते, तेव्हा तेव्हा ते ऐक्याची भाषा करतात. त्यांचे उद्दिष्ट संपले की, ते ऐक्याला विसरतात. सध्या त्यांनी केलेले आवाहनसुद्धा याचाच एक भाग आहे. आठवले हे भाजपासोबत गेल्याने ते समाजापासून दुरावले आहेत. रिपाइंचे आजवर अनेकदा ऐक्य झाले. ऐक्य झाले की तोडण्याचे कामही आठवले यांनीच केले आहे. रिडालोस त्याचे उत्तम उदाहरण आहे. सध्या रामदास आठवले यांनी ऐक्यासाठी जी कमिटी तयार केली व त्याची बैठक झाली, त्यातील सर्व सदस्य हे त्यांच्याच पक्षातील आहेत. त्यामुळे ते ऐक्याबाबत खरंच गंभीर आहेत, हे कशावरून समजायचे. कोणताही ब्रॅकेट नसलेला रिपाइं एकसंघ असावा, अशी आमची इच्छा आहे. आठवले यांनाही तसे वाटत असेल तर त्यांनी पोरखेळ सोडून यावर गांभीर्याने प्रयत्न करावेत, आम्ही कधीही तयार आहोत.
- आ. प्रा. जोगेंद्र कवाडे,
अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी


एकल जातीय राजकारणात अडकविण्याचा डाव

दलित, रिपब्लिकन ऐक्य हा चळवळीतील भावनिक मुद्दा आहे. रिपब्लिकन ऐक्याला एक इतिहास आहे. दादासाहेब गायकवाड, भंडारे, बी. सी. कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चळवळीत वाढले. ते स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्षात सोबत होते. पुढे नागपुरातील इंदोरा मतदारसंघातून कुणी लढावे यावर मतभेद झाले. दादासाहेब गायकवाड यांनी खोब्रागडे यांना पक्षाची उमेदवारी दिली व बाबू हरिदास आवाडे यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. दोघे पराभूत झाले. परंतु येथून रिपब्लिकन पक्षात दुहीची बीजे रोवली गेली. बी. सी. कांबळे, रूपवते, आवाडे यांचा एक गट, तर दादासाहेब, खोब्रागडे यांचा दुसरा गट निर्माण झाला. या फुटीनंतर दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी जनमानसाची अपेक्षा होती. ते तात्त्विक व नैसर्गिकही होते. तीच ऐक्याची री आजही ओढली जात आहे. विद्यमान रिपब्लिकन नेते एकत्र यावेत, अशी अपेक्षा असू शकते; परंतु त्याला नैसर्गिक आधार नाही. त्यामुळे एकत्र येण्याचा दुसरा मुद्दा जातसंस्कार, धर्म ठरतो. परंतु जातीय ऐक्य करणे अतिघातक असून, त्यातून रिपब्लिकन राजकारण संकुचित होऊन राष्ट्रीय पातळीवर रिपब्लिकन एकाकी पडतील. ऐक्य कोण मागते नेते की जनता हेही महत्त्वाचे आहे. व्यवहारी राजकारण करणारे, स्वत:ला टिकविण्याचा प्रयत्न करणारे नेते ही मागणी करीत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जातीय कक्षा तोडून बाबासाहेबांना अपेक्षित बहुजनवादी मांडणी करून यशस्वीपणे अकोला पॅटर्न राबविला आहे. हेच प्रस्थापित पक्षांना नको आहे. ऐक्याच्या आडून रिपब्लिकनांना जाती संस्कारात अडकविण्याचा डाव आहे.
- अविनाश डोळस,
ज्येष्ठ विचारवंत
ऐक्य आताच कशासाठी?

रिपाइं ऐक्याचे समीकरण हा एक विनोेदाचा विषय झाला आहे. रिपाइंचे ऐक्य घडवून आणायचे असेल तर आधी नेते, कार्यकर्ते दोन-चार वर्षे गुण्या-गोविंदाने एकत्र नांदले पाहिजेत; तथापि प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाइंचे ऐक्य शक्य नाही. रामदास आठवलेंना रिपाइं ऐक्याची आताच गरज का भासतेय?
रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी माझीही भूमिका आहे, मात्र यापूर्वी झालेल्या रिपाइं ऐक्याची पुनरावृत्ती होऊ नये, ही माझी अपेक्षा आहे. गटातटांत विभागलेल्या रिपाइंमुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी होत आहे. काही दिवसांपासून रामदास आठवले यांच्या रिपाइंतही अंतर्गत वाद सुरू झाला आहे. त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस मोहन पाटील यांनी आठवलेंना आंबेडकरवादी रिपाइं आठवले गट केल्याचा आक्षेप नोंदविला आहे. खरे तर आठवलेंनी रिपाइं ऐक्याचे पर्व सुरू करण्यापूर्वी त्यांच्या रिपाइंतील अंतर्गत वाद संपुष्टात आणावा. आठवलेंच्या म्हणण्यानुसार रिपाइं ऐक्यात आम्ही गेलो तर आमच्याही पक्षाचे नुकसान होईल, अशी भीती आहे. रिपाइं ऐक्य नेत्यांना हवे असले तरी सामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊनच ऐक्याचा निर्णय व्हावा. घाईगर्दीने रिपाइंचे ऐक्य झाल्यास पुन्हा तोच इतिहास उगाळला जाईल. आता कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे रामदास आठवलेंना आताच रिपाइं ऐक्याची गरज का पडली, हादेखील संशोधनाचा विषय आहे.
- राजेंद्र गवई,
राष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं (गवई गट)


कालबाह्य नेत्यांची धडपड

कालबाह्य झालेल्या नेत्यांना पुन्हा एकदा जीवदान मिळवण्यासाठी त्यांची चाललेली ही शेवटची धडपड आहे. आंबेडकरी जनता पुन्हा एकदा फसणार नाही. या मरणासन्न झालेल्या नेत्यांच्या मागे जनता पुन्हा एकदा लागणार नाही. ऐक्याचे जे काही नाटक सुरू झाले आहे, ते आंबेडकरी जनतेने कित्येक वर्षांपासून पाहिलेले आहे. त्यात नावीन्य नाही. त्यामुळेच त्यावर पडदा पडला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जनता पुन्हा त्याच-त्याच नाटकावर विश्वास ठेवणार नाही. लोकांना भूलथापा मारण्याचा प्रयत्नही सुरू आहे. मात्र लोक त्याला बळी पडणार नाहीत. तरीही शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तो येणार नाही, याला प्रश्नच नाही. प्रत्येक गटाचे नेते वेगवेगळे आहेत. त्यांचे गॉडफादरही वेगवेगळे आहेत. या ठिकाणी ऐक्याची वार्ता करणारे आणि आम्हाला ऐक्य करायचे आहे, असे सांगणारेही त्यांचे गॉडफादर सांगत नाहीत, तोपर्यंत ऐक्य करू शकत नाही. आंबेडकरी जनतेलाही या गोष्टी माहिती असून ते सत्याला सामोरे जाण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे ऐक्याच्या या प्रक्रियेत कुणीही पडणार नाही. समाजाचे ऐक्य होणे गरजेचे आहे. नेत्यांचे ऐक्य होण्याची गरज नाही. शेवटी जनतेनेच ठरवायला हवे, ऐक्य व्हायला हवे की नको. कोणताही नेता ते ठरवू शकत नाही.
- आनंदराज आंबेडकर,
रिपब्लिकन सेनेचे प्रमुखअगोदर प्रस्थापित पक्षांसोबत काडीमोड घ्या

रिपब्लिकन ऐक्याच्या नावाखाली झालेली बैठक ही केवळ दिखावा आहे. मुळात ऐक्यासाठी निवडण्यात आलेल्या समितीमध्ये एकही रिपब्लिकन कार्यकर्ता असल्याचे मला तरी वाटत नाही. साहित्यिक म्हणून त्यांची निवड केल्याचे बोलले जात असले, तरी त्यापैकी कुणीही रिपब्लिकन पक्षाचे काम केलेले आठवत नाही. याउलट सदर सदस्यांनी रिपब्लिकन चळवळीचे नुकसानच केलेले आहे. त्यामुळे ऐक्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार तरी नाही. ऐक्य करायचे असेल, तर आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी करायला हवे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षांच्या मांडीला मांडी लावून किंवा त्यांच्यासोबत संबंध ठेवलेल्या गटांसोबत ऐक्य करणे शक्य नाही.
- ज.वि. पवार, सरचिटणीस, भारिप बहुजन महासंघ


ऐक्याची संकल्पना कालबाह्य, फ्रंट हवा
काळात रिपब्लिकन पक्ष-संघटनांचे ऐक्य ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली आहे. त्याऐवजी रिपब्लिकन फ्रंट किंवा फेडरेशन तयार करणे, हा एकच प्रयोग होऊ शकतो. या फ्रंटमध्ये सहभागी झालेल्या पक्ष-संघटनांनी आपापले संघटन, पक्ष कार्यक्रम तसेच सुरू ठेवून निवडणुकांवेळी किंवा काही समान प्रश्नांवर एकत्र येणे संयुक्तिक ठरेल. रिपब्लिकन फ्रंट बनवताना बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञान आणि विचारावर एकत्र येण्याबाबत एकमत व्हावे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शह देण्यासाठी सांस्कृतिक ताकद वाढवली पाहिजे आणि त्यासाठी ‘कल्चरल फ्रंट’ तयार करावा.
- प्रा. गौतमीपुत्र कांबळे,
सेक्युलर मुव्हमेंट, सांगली


सत्तेमुळेच पडली फूट

सत्तेच्या प्रलोभनामुळे रिपब्लिकन पक्षाचे तुकडे झाले असून हे तुकडे एकत्र आल्याशिवाय दलित समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. रिपब्लिकनमधील मजबूत गट म्हणून आठवले गटाला मानले जाते. ६० टक्केदलित समाज हा आठवले यांच्या पाठीशी आहे. वेळ आलीच तर सत्तेतून पायउतार होण्यास आठवले मागेपुढे पाहणार नाहीत. पण राजीनाम्याने प्रश्न सुटत नाहीत. याउलट समाजाचे काही प्रश्न सोडवण्यात आठवले यांच्यामुळे मदतच होते आहे. सध्या आठवले ज्या पक्षात आहेत त्यांची देशात आणि विविध राज्यांत सत्ता आहे, त्याचा देशातील दलितांना फायदा होणार आहे.
- राजा सरवदे,
प्रदेशाध्यक्ष, रिपाइं आठवले गटरिपब्लिकन राजकारण म्हणजे चळवळ नव्हे
रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणालाच आम्ही आंबेडकरी चळवळ समजून गल्लत करीत आहोत. हे राजकारण म्हणजे आंबेडकरी चळवळ खचितच नाही. बाबासाहेबांनी सांगितलेला राष्ट्रवादी विचार, सांस्कृतिक उन्नयन, सामाजिक व सांस्कृतिक लोकलढे म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. त्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणजे रिपब्लिकन राजकारण आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचे भविष्यातील महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे लक्षात यावे. परंतु त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे.
- प्रा. प्रकाश सिरसट, औरंगाबाद


सत्तेच्या आधारावर  ऐक्य अशक्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवरच रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे. सत्तेच्या आधारावर कधीच ऐक्य शक्य नाही. कारण सत्तेसाठी विचार गहाण ठेवता येणार नाहीत. सामाजिक ऐक्य नसेल, तर फक्त राजकीय युती करून चालणार नाही. कारण हजारो वर्षांची गुलमगिरी संपवून आपणास मतदानाचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे आपले मत आपण कोणाच्या पारड्यात टाकतो, हे सर्वात महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समतेचे राज्य आणायचे असेल, तर पाषाणासारखे कठोरही व्हावे लागेल.
- सचिन खरात,
अध्यक्ष, रिपाइं (खरात गट)एक निरर्थक, आशावाद
आंबेडकरी चळवळीची अस्मिता मारली गेली आहे. रिपब्लिकन ऐक्य एक स्वप्न, एक भावनात्मक आव्हानच आहे. आता रिपब्लिकन जनताही अशा ऐक्याला कंटाळली आहे. आज पुन्हा आंबेडकरी चळवळीत ऐक्याची चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा रामदास आठवले आंबेडकरवाद्यांच्या भावनेला हात घालत आहेत. परंतु रिपब्लिकन ऐक्याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे. आज या सर्व नेत्यांच्या राजकारणाचा वास्तववादी दृष्टीने विचार केला पाहिजे. खरे तर आंबेडकरी चळवळ नामशेष झाली आहे आणि आंबेडकरी चळवळीच्या वास्तवावर बोलण्याची कुणातही हिंमत नाही.
- अ‍ॅड. जयदेव गायकवाड,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसरिपाइं याच नावाने  सर्व एकत्र यावेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या एकाच नावाच्या पक्षात सर्वांनी एकत्र यावे. तो पक्ष कोणत्याही गटाचा नको, त्यावर कुणाची मालकीसुद्धा नको. रिपाइंच्या एकीकरणासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. परंतु कोणताही गट नसलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या नावाच्या पक्षातच सर्वांनी एकत्र यावे, अशी आमची भूमिका आहे.
-अ‍ॅड. सुलेखा कुंभारे,
संस्थापक अध्यक्षा, बहुजन रिपब्लिकन एकता मंचआठवलेंद्वारा ऐक्याला  खीळ घालण्याचा प्रयत्न

रिपाइं ऐक्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याला खीळ कशी बसवता येईल. यासाठीच आठवलेंच्यामार्फत प्रयत्न करण्याचा हा प्रकार आहे. सर्वप्रथम मुंबई विद्यापीठातील अनुसूचित जाती-जमाती कर्मचारी संघटनेच्यावतीने एक बैठक बोलावण्यात आली होती. अराजकीय मंडळींना बोलावण्यात आले होते. या बैठकीमध्ये आठवले यांच्याविरुद्ध एकूणच सर्वांचा एकसूर हेता. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.
-डॉ. सुरेश माने, संस्थापक अध्यक्ष,
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Republican unity! Problems, Problems and Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.