रिपाइंला हवा सत्तेत वाटा
By Admin | Updated: April 6, 2015 04:19 IST2015-04-06T04:19:39+5:302015-04-06T04:19:39+5:30
रिपब्लिकन पक्षामुळे भाजपाला दलित समाजाची मते मिळाली, सत्ता आली. मात्र, सत्तेत वाटा देण्याचे लेखी आश्वासनही भाजपा पाळत नसल्याची खंत

रिपाइंला हवा सत्तेत वाटा
मुंबई : रिपब्लिकन पक्षामुळे भाजपाला दलित समाजाची मते मिळाली, सत्ता आली. मात्र, सत्तेत वाटा देण्याचे लेखी आश्वासनही भाजपा पाळत नसल्याची खंत व्यक्त करत सत्तेत वाटा न मिळाल्यास भाजपासोबतच्या युतीचा पुनर्विचार करण्याचा इशारा रिपाइं अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिला.
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आठवले बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आमची मते घेतलीत आणि सगळे मंत्री मात्र तुमचे. मग आम्ही काय करायचे, असा सवाल आठवले यांनी या वेळी उपस्थित केला. आठवलेंसह सर्वच वक्त्यांनी भाजपाने रिपाइंची फसवणूक केल्याची भावना व्यक्त केली. येत्या बुद्ध जयंतीला पंतप्रधानांच्या हस्ते इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष केवळ बौद्ध समाजाचा नसून सर्वधर्मीयांना संघटनेतील किमान ५० टक्के जागा देण्याची घोषणा आठवले यांनी केली. या वेळी एकूण १६ ठराव संमत करण्यात आले. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या मोबाइल अॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)