दस्ताची फेरफार नोंद आॅनलाइन
By Admin | Updated: May 22, 2014 05:04 IST2014-05-22T05:04:26+5:302014-05-22T05:04:26+5:30
दस्त नोंदणीची ई-फेरफार आज्ञावली विकसित करण्यात आली असून, यामुळे यापुढे हस्तलिखित पद्धतीऐवजी ई-फेरफार पद्धतीने जलदगतीने कामकाज होणार आहे

दस्ताची फेरफार नोंद आॅनलाइन
मुंबई : दस्त नोंदणीची ई-फेरफार आज्ञावली विकसित करण्यात आली असून, यामुळे यापुढे हस्तलिखित पद्धतीऐवजी ई-फेरफार पद्धतीने जलदगतीने कामकाज होणार आहे. यादृष्टीने नोंदणीबरोबरच फेरफार नोंदीची कार्यवाही करण्यासाठी नियमात सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नोंदणीकृत दस्तऐवजांच्या फेरफार नोंदीच्या वेळी पक्षकाराला परत एकदा तलाठ्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, अशा स्वरुपाच्या सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मध्ये करण्यात येतील. राज्यामध्ये दस्त नोंदणी प्रक्रियेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. नोंदणीकृत दस्तऐवजाने होणार्या फेरफार नोंदी घेतल्यानंतर दुय्यम निबंधकासमोर समक्ष उपस्थित राहून दस्तावर सही करणार्या पक्षकारास परत एकदा संबंधित तलाठ्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे विलंब टाळून अधिकार अभिलेख वेळीच अद्ययावत होतील व त्यामध्ये पारदर्शकता येईल. दस्त नोंदणी होताच त्याची माहिती आज्ञावलीद्वारे तहसिल कार्यालयातील म्यूटेशन सेलला तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल. त्या आधारे फेरफार नोंद घेऊन नमुना ९ ची नोटीस तयार करून तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल केला जाईल. त्यानुसार तलाठी किंवा परिरक्षण भूमापक (सर्व्हेअर) फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करतील. ही सगळी कार्यवाही तात्काळ आॅनलाईन होऊन नागरिकांची होणारी गैरसोय आणि विलंब टाळला जाऊ शकेल. तसेच हे सर्व अभिलेख वेळोवेळी अद्ययावत राहतील. (प्रतिनिधी)