सभागृहात गोंधळाचा ‘रिपीट टेलिकास्ट’!
By Admin | Updated: March 11, 2015 01:35 IST2015-03-11T01:35:33+5:302015-03-11T01:35:33+5:30
पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांची नाकाबंदी सुरू ठेवली़ थाळीनाद,

सभागृहात गोंधळाचा ‘रिपीट टेलिकास्ट’!
मुंबई : पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांची नाकाबंदी सुरू ठेवली़ थाळीनाद, घोषणाबाजी करीत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले़ अखेर काँग्रेसच्या त्या गोंधळी नगरसेविकांना महापौरांनी १५ दिवसांसाठी निलंबित केले़ तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी नगरविकास खात्याकडे धाव घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे़
अर्थसंकल्पातील वाढीव तरतुदीतील मोठा निधी शिवसेनेने लाटल्यामुळे विरोधी पक्षांनी सोमवारी सभागृहात गोंधळ घातला़ या प्रकरणी काँग्रेसच्या सहा नगरसेविकांना पालिकेच्या कामकाजातून दिवसभरासाठी निलंबित केले होते़ मात्र पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आज जेरीस आणले़ थाळ्यांचा नाद करीत विरोधी पक्षांनी ‘शिवसेना हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली़ त्यामुळे हतबल महापौरांनी काही वेळासाठी सभा तहकूब केली़ मात्र सभागृहाच्या दुसऱ्या सत्रातही हा गोंधळ सुरूच राहिला़ गोंधळ आणखी वाढल्यामुळे काँग्रेसच्या सहा नगरसेविकांना १५ दिवसांसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित केले आहे़
सदस्यत्व रद्द ?
काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ, पारुल मेहता, अजंठा यादव, अनिता यादव, वकारुन्नीसा अन्सारी, शीतल म्हात्रे यांना आज पुन्हा १५ दिवसांसाठी निलंबित केले़ तसेच कलम ३८ (१) अंतर्गत गैरवर्तणूक करणाऱ्या या नगरसेविकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे करणार असल्याचे महापौरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)