रस्ते दुरूस्त करा, अन्यथा टोल बंद
By Admin | Updated: August 24, 2016 03:09 IST2016-08-24T03:09:39+5:302016-08-24T03:09:39+5:30
बांधकामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पालघर येथे सुरू असलेल्या व्यापक उपोषणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली

रस्ते दुरूस्त करा, अन्यथा टोल बंद
वाडा : मनोर रस्त्यावर शनिवारी रात्री झालेल्या अपघाताची व या रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पालघर येथे सुरू असलेल्या व्यापक उपोषणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून दोन दिवसात रस्ते दुरूस्ती सुरू करा, अन्यथा टोलवसुली बंद करू अशी नोटीस सुप्रीम इन्फ्राला दिली आहे.
दोन दिवसांनी शिंदे हे या महामार्गाची स्वत: पाहाणी करणार असून तोपर्यंत खड्डे बुजविले न गेल्यास या रस्त्यावरील टोलवसुली थांबवण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वाडा मनोर रस्त्यावर शनिवारी रात्री खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) सी. पी. जोशी यांना या रस्त्याचे काम करणाऱ्या सुप्रीम कंपनीला तातडीने नोटिस देऊन दोन दिवसांत रस्ते बुजवण्याचे आदेश देण्याची सूचना केली. आपण स्वत: या कामाची पाहाणी करणार असून त्यावेळी काम समाधानकारक पद्धतीने झाले नसल्याचे आढळल्यास या मार्गावरील टोलवसुली थांबवण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
>टोल थांबविल्याशिवाय सुप्रीम वठणीवर येणार नाही
याबाबत २२ तारखेपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते
निलेश सांबरे यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी सांगितले की उपोषणाचा प्रारंभ करण्याआधी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधीत सचिवांना हे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या होत्या जोपर्यंत टोल वसुली थांबविली जात नाही तोपर्यंत हा ठेकेदार कामे पूर्ण करणार नाही. आजवर झालेली जवळपास सव्वा दोनशे आंदोलने यामुळेच असफल ठरली हे दाखवून दिल्याने त्यांनी ही कारवाई केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.