जिल्ह्यात १० कोटींच्या पीक कर्जांचे पुनर्गठण
By Admin | Updated: April 30, 2016 01:42 IST2016-04-30T01:42:53+5:302016-04-30T01:42:53+5:30
शासनाच्या निर्णयाचा पुणे जिल्ह्यात ६६ गावांमधील १ हजार ८६२ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
जिल्ह्यात १० कोटींच्या पीक कर्जांचे पुनर्गठण
पुणे : शासनाने दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला असून, शासनाच्या या निर्णयाचा पुणे जिल्ह्यात ६६ गावांमधील १ हजार ८६२ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यामध्ये १० कोटी ७७ हजार रुपयांच्या कर्जांचे पुनर्गठण होणार आहे. तर या कर्जावरील ५७ लाख रुपयांचे व्याज माफ होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोसले यांनी दिली.
सलग दोन वर्षे दुष्काळाची परस्थिती असल्याने शेतकरी वर्ग पुरता कोलमडून गेला आहे. जिल्ह्यात ९९ टक्के पीक कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वाटप करण्यात येते. त्यानुसार बँकेने सन २०१५-१६मध्ये खरीप हंगामात ६६ गावांतील १ हजार ८६२ शेतकऱ्यांना एकूण १० कोटी ७७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. या कर्जावर सुमारे ५७ लाख २८ हजार रुपयांचे व्याज झाले असून, ते माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.