अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार
By Admin | Updated: November 4, 2014 03:20 IST2014-11-04T03:20:22+5:302014-11-04T03:20:22+5:30
महाराष्ट्रात नव्यानेच सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपुरात दिले.

अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढणार
नागपूर : महाराष्ट्रात नव्यानेच सत्तारूढ झालेले सरकार अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपुरात दिले.
मुनगंटीवार यांचे सोमवारी नागपूरमध्ये आगमन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात सिंचन खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासोबतच राज्य सरकारने घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले, हे पैसे नेमके कुठे गेले हे तपासण्यासाठी अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. राज्यावर तब्बल ३ लाख ४४० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. गेल्या ५ वर्षांत ९७ हजार कोटींचे कर्ज आघाडी सरकारने घेतले, मात्र विकास कुठेच दिसत नाही. घेतलेल्या कर्जाचे काय झाले, हे तपासण्यासाठीच ही श्वेतपत्रिका काढणार असल्याचे ते म्हणाले. भाजपाने श्वेतपत्रिका काढल्यास आघाडी सरकारच्या काळातील अर्थमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)