स्वतंत्र विदर्भाबाबत संभ्रम दूर करा
By Admin | Updated: October 9, 2014 01:07 IST2014-10-09T01:07:12+5:302014-10-09T01:07:12+5:30
मोदी यांनी प्रचार सभेत मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका आणि भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे प्राप्त झालेले संकेत यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून

स्वतंत्र विदर्भाबाबत संभ्रम दूर करा
गडकरी, फडणवीसांचे मोदींना साकडे : दोन दिवसात मार्ग काढणार
नागपूर : मोदी यांनी प्रचार सभेत मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका आणि भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचे प्राप्त झालेले संकेत यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ भूमिका घेणारे विदर्भातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करावा,अशी विनंती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गुरुवारी पुन्हा याच मुद्यावर ते मोदींशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्ष विशेषत: या पक्षातील विदर्भातील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे जाहीर समर्थन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभांमधून ही बाब अधोरेखितही केली आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याच मुद्यावर भाजपला खिंडीत पकडून भाजप महाराष्ट्राचे तुकडे करणार, असा प्रचार सुरू केला आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून मोदींनी अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडली. त्यामुळे विदर्भातील भाजप नेते, पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्तेसुद्धा संभ्रमात पडले आहेत. विदर्भाच्या मुद्यावर जनतेला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. मोदींची मांडलेली अखंड महाराष्ट्राची भूमिका ही मुंबईच्या संदर्भात होती. पक्ष आजही छोट्या राज्याच्या मागणीवर ठाम आहे, असे सांगण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असला तरी तो प्रभावी ठरत नाही. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत आणि स्वबळावर सत्तेत येण्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राज्याच्या मुद्यावर मध्यम मार्ग काढून निर्माण झालेला संभ्रम दूर होणे महत्त्वाचे आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ती ओळखूनच गडकरी-फडणवीस यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली व यातून मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आले असता त्यांनाही याबाबत साकडे घालण्यात आले. गुरुवारी ९ आॅक्टोबरला रात्री मोदी पुन्हा नागपूरमध्ये येत आहेत. त्यांचा येथे मुक्काम आहे. या काळात उभय नेते त्यांची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. (प्रतिनिधी)
असा आहे पंतप्रधानांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी ९ तारखेला रात्री १०.२५ वा. मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळावर आगमन होईल. रात्री १०.४५ वा. ते राजभवनावर पोहचतील. तेथे त्यांचा मुक्काम आहे. १० आॅक्टोबरला सकाळी ९.१० मिनिटाने विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते ब्रम्हपुरी येथे प्रचारसभेसाठी जातील.