‘सेनाही सत्तेत आहे हे लक्षात असू द्या!’
By Admin | Updated: February 2, 2015 04:47 IST2015-02-02T04:47:35+5:302015-02-02T04:47:35+5:30
सरकार ज्या घोषणा करीत आहे व निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे

‘सेनाही सत्तेत आहे हे लक्षात असू द्या!’
मुंबई : सरकार ज्या घोषणा करीत आहे व निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मागील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये व आपल्या सरकारमध्ये काही फरक आहे हे दिसले पाहिजे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
रायगड जिल्ह्यातील महेंद्र थोरवे यांनी रविवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून शेकापमध्ये प्रवेश केला होता. या वेळी ठाकरे म्हणाले की, आपण टीकेला सुरुवात केलेली नाही किंवा आमचे काही बिनसलेले नाही. परंतु आम्ही जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आमचे काम आहे. जी कामे करायची आहेत ती आम्ही सोबतच करू. मुंबई पालिकेतील निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन झाले पाहिजेत.
शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली खाती व्यवस्थित सांभाळावी. त्यामुळे लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, अशा शब्दांत उत्तर दिले तर मित्रपक्षाने भाजपाशी थेट संवाद साधावा, वृत्तपत्रांच्या माध्यमातून सल्ले देऊ नयेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)