पाणंद रस्ते उरले कागदावर

By Admin | Updated: July 31, 2016 01:39 IST2016-07-31T01:39:06+5:302016-07-31T01:39:06+5:30

नाणे मावळमध्ये पाणंद, तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व फक्त कागदावर (नकाशा) उरले आहे.

On the remaining paper on Panand Road | पाणंद रस्ते उरले कागदावर

पाणंद रस्ते उरले कागदावर


करंजगाव : नाणे मावळमध्ये पाणंद, तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व फक्त कागदावर (नकाशा) उरले आहे. हे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बहुतांश पाणंद, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यक्ती अथवा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत बसलेले व डोंगर, दर्या, निसर्गाचे मोठे देणे लाभलेल्या नाणे मावळामध्ये या भागात जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्या आहेत.
मावळ तालुका पवन, आंदर आणि नाणे मावळ अशा तीन विभागांमध्ये विभागला आहे. तालुका विविध पर्यटनस्थळे, गडकिल्ले, धरणे, निसर्गरम्य डोंगर-दऱ्यांनी नटलेला आहे. पर्यटकांची मावळामध्ये रोज गर्दी असते. दु्रतगती महामार्गामुळे जवळ आलेली मुंबई, पुणे ही महानगरे, राष्ट्रीय महामार्ग, वाढते औद्योगिकीकरण आदीमुळे शहरीकरण वाढले आहे. खंडाळा लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, सोमाटणे, देहुरोड आदी भागामध्ये शहरीकरण वाढल्यामुळे अनेकांनी खेडेगावाकडे मोर्चा वळविला. परिणामी ग्रामीण भागातील जमिनींनाही सोन्याचा भाव आला आहे. बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींमध्ये मावळाचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे त्यांनी मावळामधे गुंतवणूक वाढवली. अनेकांनी जमिनी विकत घेऊन उद्योग-व्यवसाय, धरणाशेजारी रो हाऊस-बंगले बांधले. विकासाच्या या वाटचालीत गावोगावी असलेल्या जुन्या पाऊलवाटा, पाणंद, इतर रस्ते दिसेनासे होत आहेत. पाऊलवाटा, पांदण छोय्या अंतर्गत रस्त्यांचा उपयोग शेतकरी शेतऔजारे, बैल, जनावरे, शेतीपयोगी साहित्य ने-आण करण्यासाठी करीत असत. महिला पाणी भरण्यासाठी अथवा इतर कामासांठी त्यांचा वापर करीत असत. परंतु बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केलेल्या जमिनींमुळे जुन्या पाऊलवाटा सीमाभिंती कुंपणात बंदिस्त झाल्या. त्यामुळे विशेषत: शेतकऱ्यांची खूप गैरसोय होत आहे. त्यांना रस्ते बंद झाल्याने वळसा घेऊन शेताकडे जावे लागत आहे. कुंपणासाठी विनापरवाना वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. त्यामुळे जंगलांचा ऱ्हास होत आहे. सिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे पशु-पक्षी जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यवरच गदा आली आहे.
सरकारी पाणंद रस्त्यावरदेखील बांधकाम व्यावसायिक व काही स्थानिकांनी संगनमताने अतिक्रमण केले आहे. २०-३० फूट रुंदीचे पाणंद, रस्ते आता फक्त नकाशावरच उरले आहेत. गावामध्ये काही जमीनदारांनी जमिनी खरेदी केल्या असून, सरकारची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तेथे रस्ते तयार केले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने पाणंद, रस्ते गिळंकृत केले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणामुळे चार-पाच फुटांचाच पाणंद रस्ता उरला आहे. अनेक पाणंद, रस्त्यांवर झाडे लावून अतिक्रमण केले आहे. शासनाने कागदोपत्री असलेल्या नोंदीप्रमाणे तत्काळ पाणंद,, तसेच गावांतर्गत रस्ते जाण्यासाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
>सिमेंटची जंगले : प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत
अतिक्रमण करणारे हे जमीनदार किंवा बडी मंडळी असल्यामुळे तक्रार केली, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. ग्रामीण भागात जमिनी खरेदी करून प्लॉटिंग करून विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. जागोजागी सिमेंटची जंगले उभी राहत असून कसलीही परवानगी न घेता स्थानिक व्यक्ती व त्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंगरांचे उत्खनन करीत आहेत. उंच ठिकाणच्या बंगल्याच्या रस्त्यासाठी डोंगर, टेकडीचे उत्खनन होत आहे. ते करताना झाडांची कत्तल केली जाते. एजंटमार्फत शेतकरी जमिनी विकत आहेत. परंतु जमिनी न विकणाऱ्या शेतकऱ्यांना बांधकाम व्यावसायिक, विकसकाचा त्रास सहन करावा लागतो. एजंट जमिनी विकण्यास भाग पाडून स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

Web Title: On the remaining paper on Panand Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.