शासकीय सेवेतील चारित्र्याची व्याख्या जारी
By Admin | Updated: August 28, 2014 03:31 IST2014-08-28T03:31:29+5:302014-08-28T03:31:29+5:30
शासकीय सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या
शासकीय सेवेतील चारित्र्याची व्याख्या जारी
मुंबई : शासकीय सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या. जे दिवाणी गुन्हे किरकोळ स्वरूपाचे आहेत व त्यात न्यायालयात रीतसर खटला चालून २ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा किरकोळ स्वरूपाची शिक्षा झाली आहे, अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
दिवाणी स्वरूपाचे जे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत वा अशा उमेदवारांविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारी दिवाणी स्वरूपाच्या असल्यास ज्या गुन्ह्यांसाठी संभाव्य दंडाची कमाल मर्यादा २ हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल किंवा किरकोळ स्वरूपाची शिक्षा असेल तर अशा उमेदवारांनाही नियुक्ती दिली जाईल. फौजदारी गुन्ह्यांसंदर्भात मात्र कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वा प्राप्त झालेल्या तक्रारी फौजदारी स्वरूपाच्या असतील तर अशा उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाणार नाही. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, शासकीय अनुदानप्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था, शासकीय उपक्रम, महामंडळे आणि मंडळांसाठी या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. विविध पदांवरील नियुक्ती देताना सक्षम प्राधिकाऱ्याला निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी दोन समित्या नियुक्त करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)