पंढरपुरात मृताच्या नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड
By Admin | Updated: November 7, 2016 16:35 IST2016-11-07T16:35:53+5:302016-11-07T16:35:53+5:30
पोटाच्या विकारासाठी उपचाराकरता दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान २ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला

पंढरपुरात मृताच्या नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 7 - पोटाच्या विकारासाठी उपचाराकरता दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान २ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असतानाही संबंधित डॉक्टरांनी नातेवाईकांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मेडिकेअर आयसीयूची तोडफोड केली आहे.
पंढरपूर शहरातील सुनीता आंबेकर या ३५ वर्षीय महिलेस तिच्या नातेवाईकांनी शनिवारी अपेंडिक्सच्या आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर टकले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. शनिवारी संध्याकाळी सुनीता यांच्यात अपेंडिक्स आजाराची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. मात्र काही वेळानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने सुनीता यांना मेडिकेअर आयसीयूत दाखल करण्याचा निर्णय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घेतला. कोणत्याही नातेवाईकांना रुग्णाच्या जवळ जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे .
मात्र रुग्णाच्या नातेवाईकांना आज सकाळी सुनीता यांचा मृत्यू झाला असून, आयसीयूमध्ये फक्त उपचार देत असल्याचा दिखावा असल्याची माहिती आंबेकर यांच्या फॅमिली डॉक्टरांनी दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी खात्री केल्यानंतर संतप्त झालेल्या आंबेकर यांच्या नातेवाईकांनी मेडिकेअर आयसीयूमधील साहित्याची तोडफोड सुरू केली. पंढरपुरात अशा प्रकारे रुग्ण मयत होऊनही आयसीयूत उपचार देऊन रुग्णाच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. मात्र सदर मृत महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर टकले यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, असं सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.