‘त्या’ सिंचन प्रकल्पांची फेरनिविदा
By Admin | Updated: May 21, 2016 05:04 IST2016-05-21T05:04:41+5:302016-05-21T05:04:41+5:30
राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे.

‘त्या’ सिंचन प्रकल्पांची फेरनिविदा
मुंबई : राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी या प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक मूल्यांकन करून सद्य:स्थितीतील ठेकेदारांचे ठेके रद्द करणे आणि उर्वरित कामांच्या फेरनिविदा त्वरित काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी
दिली.
सिंचन प्रकल्पासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील व अवर्षणग्रस्त भागातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. भूसंपादनातील दिरंगाईमुळे लागणारा अतिरिक्त खर्च केंद्र सरकारकडून मिळविणे आणि प्रकल्पांसाठी ३० हजार कोटींचे कर्ज उभारण्याबाबतही या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
अपूर्ण सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.