‘अॅसिड हल्ल्यातील जखमींचे प्रतिष्ठेसह पुनर्वसन करणार’
By Admin | Updated: March 1, 2017 05:44 IST2017-03-01T05:44:20+5:302017-03-01T05:44:20+5:30
विविध अॅसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांपैकी अनेकांच्या पदरी उपेक्षेचे जिणे येते.

‘अॅसिड हल्ल्यातील जखमींचे प्रतिष्ठेसह पुनर्वसन करणार’
मुंबई : विविध अॅसिड हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांपैकी अनेकांच्या पदरी उपेक्षेचे जिणे येते. त्यांना सन्मानाने पुन्हा आयुष्यात उभे करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य महिला आयोग आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने ५ मार्चला सायंकाळी ६ वाजता वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये एक अनोखा कार्यक्रम त्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
अॅसिड हल्ला पीडितांकडे समाज एकतर दयाभावनेने पाहतो किंवा त्यांना झिडकारतो. अन्य सामान्य माणसांसारखे त्यांना स्वीकारले जात नाही. हा भेदभाव दूर व्हावा हा ५ मार्चच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पीडितांचे पुनर्वसन करणे, त्यांना शस्रक्रियेसाठी मदत करणे असे उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. ‘अलग मेरा ये रंग है, मेरी खुद से ये जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तू मेरे संग है’ असा विश्वास अॅसिड हल्लाग्रस्तांमध्ये निर्माण करण्याचे काम या निमित्ताने होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
>या कार्यक्रमात स्वत: अमृता फडणवीसच नव्हे तर नामवंत कलाकार, ज्येष्ठ शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी हे अॅसिड हल्ला पीडितांबरोबर रॅम्पवर दिसतील. मुख्यमंत्र्यांची कन्या दिविजा ही देखील एका पीडिताबरोबर रॅम्पवर चालणार आहे.