अपघातग्रस्त मच्छिमारांचे पुनर्वसन करणार
By Admin | Updated: August 24, 2016 03:12 IST2016-08-24T03:12:02+5:302016-08-24T03:12:02+5:30
मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले.

अपघातग्रस्त मच्छिमारांचे पुनर्वसन करणार
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- समुद्रात काबाडकष्ट करणारा मच्छिमार हा शेतकरी असल्याने मासेमारी करतांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी २३ आॅगस्ट रोजी झाई येथे केले. दोन दिवसांपूर्वी समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाल्याच्या घटनेनंतर सुखरूप परतलेल्या खलाशांच्या कुटुुंबियांना धीर देण्यासाठी खासदार चिंतामण वनगा यांच्यासह झाई येथे आले होते.
या वेळी झाईतील मांगेला समाज मच्छिमार सहकारी सोसायटीच्या प्रांगणात स्थानिक मच्छिमार जमले होते. अपघातग्रस्त दोन्ही बोटींचेमालक आणि स्वबळावर किनाऱ्यापर्यंत पोहचणाऱ्या खलाशांची पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा यांनी विचारपूस करून साहसाचे कौतुक केले. अशोक अंभिरे यांनी मच्छिमारांचे प्रश्न मांडले. मच्छिमारांचे पुनर्वसन, लाईफजॅकेट, बोटीत सौरदिवे, इन्व्हर्टर, मासेमारी करतांना अपघात घडल्यास दोन ऐवजी चार लाख नुकसानभरपाई आदी मागण्या मांडण्यात आल्या. शिवाय दोन्ही बोटींच्या मालकांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मच्छिमारांच्या विम्याची रक्कम भरण्यासह नवीन बोटींची प्रकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार चिंतामण वनगांनी सांगितले.
या दुर्घटनेची सखोल माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना दिली आहे. पीडित बोटमालक आणि खलाशांच्या रोजगार आणि पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याची हमी शासनाच्या वतीने आपण घेत असल्याचे आश्वासन सवरा यांनी दिले. गुजरातने मच्छिमारांना दिलेल्या सुविधा, महाराष्ट्रातील मच्छिमारांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणार आहे. खलाशांनी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही त्यांना मदत न पुरविणाऱ्या तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी करणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी लोकमतला दिली. या वेळी जि. प. सभापती धर्मा गोवारी, डहाणू उप विभागीय दंडाधिकारी अंजली भोसले, डहाणू व तलासरी तहसिलदार, झाई सरपंच जनी सांबर, पंचायत समिति सदस्य प्रकाश सांबर, मिच्छमार नेते नरेंद्र पाटील, राजेंद्र मेहेर आणि स्थानिक मच्छिमार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.